ठाकरे ब्रँडच्या इमारतीची पहिली वीट रचली! राज ठाकरे मातोश्रीवर! उद्धवना वाढदिवस शुभेच्छा

ठाकरे ब्रँडच्या इमारतीची पहिली वीट रचली राज ठाकरे मातोश्रीवर! उद्धवना वाढदिवस शुभेच्छा


मुंबई- मराठी भाषेच्या निमित्ताने एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचा पाया रचल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन राज ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडच्या पायावर इमारतीची पहिली वीट रचली. हे पाऊल टाकल्यानंतर आता दोघा भावांना एकत्र राहणे अपरिहार्य होणार आहे. कारण जो भाऊ आता या युतीतून माघार घेईल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस होता. यानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण होते. मातोश्रीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मातोश्रीबाहेर शुभेच्छा देणारी पोस्टर लावली होती. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी उमटली होती. यादरम्यान सकाळी 11 वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून उबाठा खासदार संजय राऊत यांना फोन करून मातोश्रीवर येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर दुपारी 12 वाजताच्या सुमारास राज ठाकरे बाळा नांदगावकर यांच्यासह मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे स्वत: त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर आले. राज यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ दिला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यानंतर दोघेही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. तिथे राज यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी दोन्ही बंधुंमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. भेट संपल्यानंतर राज ठाकरे निघून गेल्यानंतर या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला खूप खूप आनंद झाला. राज ठाकरे पत्रकारांशी काही न बोलता निघून गेले होते. मात्र भेटीनंतर एक्स पोस्ट करीत लिहिले की, माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे आनंद द्विगुणीत झाला. ते बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन नतमस्तक झाले. दोन भाऊ अनेक वर्षांनी ज्या ठिकाणी एकत्र वाढले तेथे भेटले.
6 वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर गेले. 2012 मध्ये उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा आजार झाला तेव्हा राज यांनी स्वतः कार चालवत त्यांना मातोश्रीवर आणले होते. तर 2019 मध्ये अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते. मात्र, उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा जोरात सुरू असतानाच ही भेट झाल्याने ती विशेष ठरली. या भेटीमुळे खास करून शिवसैनिक आणि मनसैनिक आनंदून गेले आहेत. मातोश्रीवर शिवसैनिकांनी म्हटले की, आज खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले. आता शिवसेना आणि मनसेची युती होणारच आहे. या भेटीवर खासदार संजय राऊत म्हणाले की, दोन भाऊ भेटले. त्यांनी एकमेकांना प्रेमाचे आलिंगन दिले.
शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रांवर चर्चा झाली. बरीच चर्चा झाली. दोन नेते भेटले नाहीत, तर दोन भाऊ मनाने एकत्र येत भेटले. ही भेट गरजेची आहे. त्यामुळे नाते दृढ झाले.
उबाठा आमदार भास्कर जाधव युती झाल्याचे सांगत म्हणाले की, दोन भाऊ एकत्र येतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अनेकांच्या मनात संशय होता. या संशयाला पूर्णविराम मिळाला. दोन भाऊ एकत्र आले, ही महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आनंदाची गोष्ट आहे. कार्यकर्ते एकत्र येतील .आम्ही ते करू. त्याची कोणी काळजी करू नये. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांच्या वास्तव्याने आमच्यासाठी पवित्र झालेले मातोश्रीत जाऊन माझ्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 2 पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1 +1 =2 अशी होते. पण जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1 = 11 होते. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठे आपुलकीचे गिफ्ट हे आज राज यांनी दिले. बाळासाहेब… हा सुवर्णक्षण बघायला आज खरेच आपण हवे होता. आपला मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र बघून नक्कीच आनंदी झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भेटीला फारसे महत्त्व न देता म्हटले की, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले ही आनंदाची गोष्ट आहे.यामध्ये राजकारण पाहणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही समजेल. मात्र काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, असे म्हणणे योग्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन भावांनी काय करावे ते त्यांनी ठरवावे.
वरळीत पाद्यपूजनाला
फक्त अमित ठाकरे उपस्थित

मुंबई पोलिसांचा राजा अशी ओळख असलेल्या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा होती.मात्र अमित ठाकरेंनीच या सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी वरळी पोलीस कॅम्प गोविंदा पथकाने ७ थरांची सलामी देखील दिली.