भाजपाचे 2 मंत्री व पक्षबदलू 16 आमदार हनी ट्रॅपमध्ये अडकले! राऊतांचा गौप्यस्फोट

2 BJP ministers and 16 MLAs who defected are caught in a honey trap! Raut's revelation

मुंबई-राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्री आणि उबाठाचे 16 माजी आमदार व खासदार अडकले आहेत, असा गौप्यस्फोट उबाठा नेते संजय राऊत यांनी केला. ते आज असेही म्हणाले की, याचे 4 पेनड्राईव्ह आणि दोन सीडी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपा रोज धाडी टाकायला लावत आहे. या चार मंत्र्यांपैकी दोन मंत्री भाजपाचे आहेत. ज्या प्रफुल्ल लोढाकडे हे पेन ड्राईव्ह आहेत त्याने आज व्हिडिओ पोस्ट करीत म्हटले की, मी एक बटण दाबले तर देशात हाहाःकार माजेल. पण कुणी कुणाचे पती आहे, मुलगा आहे म्हणून मी गप्प आहे. माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी पोलिसांत तक्रार केली आहे.
राऊत म्हणाले की हनी ट्रॅप प्रकरणात कोण कोण अडकले आहेत याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मात्र ते धडधडीत खोटे बोलत आहेत. पेनड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी पाहिले आहे, त्यांना विचारले तर ते सर्व सांगू शकतात. हनी ट्रॅपमध्ये विरोधी पक्षांचे नेते आणि बड्या सरकारी अधिकाऱ्यांना अडकवण्याचे कारस्थान भाजपानेच रचले होते. त्यासाठी प्रफुल्ल लोढा याचा वापर भाजपाने केला. मात्र आता हा डाव त्यांच्यावर उलटला आहे. प्रफुल्ल लोढाविरूध्द मुंबईत 14 जुलैला दोन गुन्हे दाखल झाले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेचे आणि एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबाबत हे गुन्हे आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी लोढाच्या पेन ड्राईव्ह आणि सीडींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या प्रफुल्ल लोढाने विरोधी पक्षातील नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या नादात भाजपाच्या दोन मंत्र्यांनाही त्यात अडकवले. त्याच्यासह महायुतीतील घटक पक्षातील दोन मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. याशिवाय शिवसेना फुटली तेव्हा जे 16 आमदार व खासदार पक्ष सोडून गेले ते याच हनी ट्रॅपमुळे गेले असा दावा करीत संजय राऊत म्हणाले की, मरीन लाईन्स पुलाखाली ते लोक यायचे आणि पेनड्राईव्ह दाखवत धमकावायचे. त्यामुळे आमचे चार तरुण खासदार पक्ष सोडून गेले. माझ्याकडे ही सर्व माहिती आहे. पण एक मर्यादा पाळावी म्हणून संबंधित मंत्र्यांची नावे मी अद्याप जाहीर केलेली नाहीत. हे पेन ड्राईव्ह आणि सीडी मिळवण्यासाठी भाजपा आता जंगजंग पछाडत आहे. आज सकाळीदेखील पोलिसांनी हा महत्त्वाचा ऐवज जप्त करण्यासाठी काही ठिकाणी धाडी टाकल्या अशी माहिती आहे, असे राऊत यांनी सांगितले.
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळचा जामनेरचा कार्यकर्ता भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहकारी आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आज केलेल्या दाव्याचा रोख गिरीश महाजन यांच्यावरही होता. या प्रकरणावरून राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही कडाडून टीका केली. एकनाथ शिंदे यांचे सरकार घटनाबाह्य होते. तर फडणवीस यांचे सरकार अनैतिक आणि व्यभिचारी सरकार आहे. त्यांच्या काळात दररोज नवनवे राडे घडत आहेत. मंत्री, आमदार हाणामारीवर उतरल्याचे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्षातील खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांना भाजपात येण्यास भाग पाडण्यात आले आहे. एवढे सर्व होत असताना सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणवले जाणारे फडणवीस भाषणे देत फिरत आहेत. आपल्या वाह्यात नेत्यांना पाठीशी घालत आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री या राज्याने आजवर पाहिला नव्हता, अशा शब्दांत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.