मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच भाजपाचे वॉशिंग मशीन जोरात सक्रिय झाले आहे. उबाठातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आणि माजीसमाजकल्याण मंत्री बबन घोलप या भ्रष्ट प्रतिमा असलेल्या नाशिकमधील नेत्यांना आज भाजपाने समारंभपूर्वक पक्षात प्रवेश दिला. प्रवेशापूर्वी या नेत्यांनी नरिमन पॉईंट येथील भाजपा कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवत हजारो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे, बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला नाशिक पश्चिमच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही मंत्री महाजन यांच्या पुढाकाराने आज हा पक्षप्रवेश झाला.
बडगुजर आणि घोलप यांच्याबरोबर नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि नयना घोलप, माजी नगरसेवक अशोक सातभाई, दिलीप दातीर, हर्षा बडगुजर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला या पक्षप्रवेशाची काहीच कल्पना नसल्याचे सकाळी म्हटले होते. तेच दुपारी पक्षप्रवेशाच्या वेळी हजर होते.
पक्षप्रवेशाच्या वेळी सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपा प्रवेश झाल्यामुळे मी चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांचे मनापासून आभार मानतो. महाजन हे खरोखरच संकटमोचक आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे. आपत्ती आली की, ते मार्ग काढतातच. माझ्या बाबतीतही त्यांनी मार्ग काढला. मी समाजाची सेवा करतो आणि समाजासाठी झटतो. कोविड काळात कोणी बाहेर येत नव्हते, त्या काळात मी सेंटर सुरू करून पक्षासाठी काम केले. परंतु नियती फिरली आणि माझ्यावर पक्षाने कारवाई केली. परंतु ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्यांना मी सांगू इच्छितो की, महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल. यापुढे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जे मार्गदर्शन करतील त्याचे तंतोतंत पालन करेन. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. माजी मंत्री बबन घोलप म्हणाले की, सुधाकर बडगुजर या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अपमान झाला. म्हणून मी आज त्यांच्यासोबत आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा ठाकरे गटात सन्मान होत नाही, अशा ठिकाणी का राहायचे? महाराष्ट्राच्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला विजयी करण्याचा आता आमचा निर्धार आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या वेळी नाशिक महापालिकेत 68 नगरसेवक होते. आता आकडा आपल्याला शंभरीपार न्यायचा आहे. काही लोक माझ्यावर दलाली करण्याचा आरोप करतात. परंतु पक्ष मोठा करणे म्हणजे दलाली नाही. राज्यातील जनतेचा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. आगामी काळात अनेक जण भाजपा पक्षप्रवेश करणार आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, भाजपात होणारा प्रत्येक पक्षप्रवेश विकासासाठी होतो. त्या अनुषंगाने कोणतीही आशा अपेक्षा न ठेवता, नाशिक शहराच्या विकासासाठी आज बडगुजर आणि घोलप यांच्यासह नेत्यांनी पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होणार होता. पण गिरीश महाजन यांनी आजच हा कार्यक्रम ठरवला म्हणून आम्हाला यायला थोडा उशीर झाला. आम्हाला पक्षात सर्व मतभेद आणि मनभेद दूर करायचे आहेत. जोपर्यंत न्यायालय एखाद्याला दोषी ठरवून शिक्षा देत नाही, तोपर्यंत आरोप सिद्ध झालेले नसतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. जे टीका करतात, तेच तुरुंगात जाऊन आलेले आहेत. मागील आठवड्यात आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध 29 गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना दीड वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांची बदनामी, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात त्यांची भूमिका राहिली. याकडे लक्ष वेधत सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या भाजपाप्रवेशास कडाडून विरोध केला होता. त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास भाजपाची प्रतिमा मलिन होईल आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली होती. मात्र, तरीही भाजपाने बडगुजर यांना प्रवेश दिला.
या पक्षप्रवेशावर उबाठाचे खा. संजय राऊत म्हणाले की, भाजपाने कोणाला पक्षात घ्यावे हा त्यांचा विषय आहे. आमच्या पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा, हा आमचा प्रश्न आहे. दाऊद इब्राहिम त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर ही त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे. आधी आरोप करायचे आणि नंतर त्यांना पक्षात घ्यायचे आणि पक्ष वाढवायचा असे चालू आहे. जे आज भाजपामध्ये गेले आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे. ते सर्व फिरत्या रंगमंचाचे सदस्य आहेत.
बावनकुळेंचे फोटो बडगुजरांनीच दिले?
काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब मकाऊला गेले होते. त्याठिकाणी त्यांचे कॅसिनो खेळतानाचे त्यांचे फोटो उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केले होते. त्यानंतर बावनकुळेंवर टीका झाली होती. ते फोटो बडगुजर यांच्या माध्यमातून खासदार राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
घोलप यांच्यावरही आरोप
माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मिलिंद यवतकर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून 2014 मध्ये बबन घोलप आणि त्यांच्या पत्नीला सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. 1999 मध्ये भाजपा शिवसेना सरकारमध्ये घोलप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याकडून समाजकल्याण मंत्रिपद काढून घेतले होते. अवामी मर्कंटाईल सहकारी बँकेच्या साडेचार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर नारायण राणे यांनी घोलप यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले होते.
नितेश राणेंनी भूमिका बदलली
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनात अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर या दोघांचे एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो विधानसभेत दाखवले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली होती. मात्र बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यावर नितेश राणेंनी भूमिका बदलली. ते म्हणाले की, हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते भाजपात आल्यास हरकत नाही.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







