Home / महाराष्ट्र / मंत्री संजय शिरसाटांचा नवा कारनामा! 10 एकर मुलांच्या नावे! त्र्यंबकला हॉटेल

मंत्री संजय शिरसाटांचा नवा कारनामा! 10 एकर मुलांच्या नावे! त्र्यंबकला हॉटेल

छत्रपती संभाजीनगर- शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा जमीन हडपल्याचा आरोप झाला आहे . त्यांनी हरिजन समाजाची...

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर- शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा जमीन हडपल्याचा आरोप झाला आहे . त्यांनी हरिजन समाजाची 10 एकर जमीन त्यांच्या दोन मुलांच्या नावे तर केलीच , पण एकरला 3 कोटी किंमत असलेली ही दहा एकर जमीन केवळ 1 कोटी 10 लाख इतक्या कमी भावात घेतली . इतकेच नाही तर त्र्यंबकेश्वर येथे ते हॉटेल बांधत असल्याचेही सांगितले .
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करीत त्याचे पुरावेही दिले. या आधीही हॉटेल विट्स लिलाव आणि एमआयडीसी भूखंड प्रकरणांवरून जलील यांनी शिरसाटांवर आरोप केले होते. आता त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शहाजापूरमधील सरकारी 10 एकर जमीन फक्त 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली असून ती जमीन सध्या 30 कोटी रुपये मूल्यमानाची असल्याचा दावा केला आहे.
जलील यांनी हे आरोप केल्यानंतर काही संघटनांनी समाज माध्यमांवर जलील यांच्या घरावर आज शेण फेकून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.या आंदोलकांना जालन्यातील कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले. इम्तियाज जलील कोणतीही शहानिशा न करता आरोप करत असल्याने शिरसाट समर्थक जलील यांच्या घरावर शेण फेकून आंदोलन करणार होते. त्यामुळे जलील यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलक जलील यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जलील म्हणाले की, ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे ते चांगल्या रितीने चर्चा करू शकतात. तुम्हाला जे कागदपत्र हवे आहेत ते मी देऊ शकतो. शिरसाट यांनी एमआयडीसीच्या जमिनीबाबत बोलावे. मी 24 तासांत पुरावे देतो. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, ते पुरावे मी तुम्हाला देईल. जालन्यातून इथे माझ्या घरावर शेण फेकायला का येत आहे? संभाजीनगरमध्ये त्यांचे समर्थक नाहीत का? सगळ्यांना माहित आहे की मी काहीही खोटे बोलत नाही. त्यामुळे आता त्यांना जालन्यात पैसे देऊन इथे माझ्या घरावर चिखल फेकायला कार्यकर्ते आणावे लागत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे शिरसाटांच्या आलिशान हॉटेलचे काम सुरु आहे. कुंभमेळ्यावेळी त्यांना चांगला फायदा मिळणार आहे. मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर अधिक माहिती देऊ शकतो. शिरसाट यांनी सरकारी जमीनही सोडली नाही. हरिजन समाजाची शहाजापूर येथील 10 एकर जमीन त्यांनी तुषार व सिध्दांत या दोन मुलांच्या नावे केली. 1 कोटी 10 लाखांच्या भावाने 10 एकर जमीन घेतली, सध्या या जमिनीची किंमत 3 कोटी प्रति एकर आहे. हरिजन समाजाला दिलेली जमीन घेण्यासाठी तलाठी आणि जिल्हाधिकारी यांचा ठसा लागतो. त्यांनी निलंबित तलाठी बागडे यांना तात्पुरता पदभार देऊन त्यांच्या मदतीने हे सर्व केले. ते निलंबित असताना त्यांना शहाजापूरमध्ये चार महिन्यांसाठी पोस्टींग दिली. जिल्हाधिकारी शिक्का देत नव्हता तर त्याच्यावर
दबाव टाकला.
संजय शिरसाट यावर म्हणाले की, मला इम्तियाज जलील यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. असे दलाल येतात आणि जातात.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या