Home / महाराष्ट्र / महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल! उद्धव ठाकरेंनी टाळीचा खेळ सुरू ठेवला!

महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल! उद्धव ठाकरेंनी टाळीचा खेळ सुरू ठेवला!

मुंबई- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि उबाठा गटाच्या...

By: E-Paper Navakal
Will Fadnavis be kind to Uddhav Thackeray today?

मुंबई- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि उबाठा गटाच्या युतीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ही युती होणारच अशी जनमानसात चर्चा आहे . मात्र दोघा ठाकरे बंधूंनी ठोस पावले न टाकता सध्या केवळ टाळीच्या बातम्यांचा खेळ सुरू ठेवला आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी जनतेला अशा तऱ्हेने झुलवत ठेवण्याची ही ठाकरेंची पध्दत आहे . याचनुसार आज उद्धव ठाकरे इतकेच म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही. संकेत नको , मी बातमीच देतो, असे वक्तव्य आज उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषदेत केले. यामुळे पुन्हा युतीच्या बातम्यांचा खेळ सुरू झाला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत युतीबाबत प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की भांडणे आणि वाद या गोष्टी क्षुल्लक आहेत. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणे कठीण नाही. राज ठाकरेंच्या या पूर्ण राजकीय सोयीच्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र हितासाठी आपणही दोन पावले पुढे येण्यास तयार आहोत असे तितकेच राजकीय भाष्य केले होते. यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर याविषयी टोलेबाजी करीत आहेत. आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत. संकेत देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमीच देतो. यामुळे पुन्हा विषय चर्चेला आल्यावर उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा. ठाकरे बंधूंनी एकतर बसून मतभेद मिटवले पाहिजेत. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील 4 माणसे आणि राज ठाकरे यांच्या विश्वासातील 4 माणसे यांनी एकत्र येऊन नक्की दोन्ही पक्षांचा काय प्रस्ताव आहे तो समोर ठेवावा. जर प्रस्ताव मान्य असतील तर चांगले होईल. नसेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी आपापले पक्ष अबाधित ठेवावे. कोणीही कोणाचा पक्ष कोणत्याही पक्षात विलीन करू नये. यावर मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014 आणि 2017 मध्येही युती करावी अशी इच्छा होती. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. रोज सकाळी भोंगा कोण वाजवत आहेत? जे भोंगा वाजवत आहेत त्यांनी युतीचा प्रस्ताव तयार करावा. एखादा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील. मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. मनसे सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या सर्व भावनांचा राज ठाकरे यांना आदर आहे. सकाळी बोलले म्हणजे युती झाली असे नसते. त्यासाठी प्रस्ताव महत्त्वाचा आहे. संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे काहीही ठोस न सांगता दोघांचे बोलणे झालेही असेल , फळ लागेल तेव्हा दिसेल .
मनसे -ठाकरे कार्यकर्त्यांचे दुसरीकडे मनोमिलन सुरु
राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले आहे. काही दिवसापूर्वी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाने डोंबिवलीत पलावा पुलाच्या कामासाठी एकत्र आंदोलन केले होते. काल नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचे फोटो घेऊन एकत्र येण्याबाबत जोरदार घोषणा दिल्या होत्या. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानिमित्त वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. या पुजेचे आमंत्रण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या