Home / महाराष्ट्र / महाराष्ट्र सदन घोटाळा! भुजबळांसह सीएही निर्दोष

महाराष्ट्र सदन घोटाळा! भुजबळांसह सीएही निर्दोष

मुंबई- दिल्लीतील महाराष्ट्र सदनाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सनदी लेखापाल (सीए) श्याम...

By: E-Paper Navakal

मुंबई- दिल्लीतील महाराष्ट्र सदनाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सनदी लेखापाल (सीए) श्याम राधाकृष्ण मालपानी यांना आज मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त ठरवत विशेष न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. विशेष न्यायालयाने छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांना याआधीच मूळ गुन्ह्यातून दोषमुक्त केले आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात 2016 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ आणि इतरांविरोधात आर्थिक गैरव्यवहारासंबंधी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात भुजबळ यांना अडीच वर्षे तुरुंगवासही झाला होता. या प्रकरणात भुजबळ यांचे सनदी लेखापाल श्याम मालपानी यांनाही आरोपी करण्यात आले होते. ईडीच्या आरोपानुसार, मालपानी यांनी भुजबळ यांच्या नियंत्रणातील संस्थांचे लेखापरीक्षण करताना संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांना भुजबळांच्या बनावट व्यवहारांची माहिती असून त्यांनी बेकायदेशीर निधी मिळवण्यासाठी त्यांना मदत केल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, मालपानी यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांनी केवळ 2012 ते 2015 या कालावधीत लेखापरीक्षणाची जबाबदारी पार पाडली होती, तर भुजबळ प्रकरणातील संशयास्पद व्यवहार 2007-08 या कालखंडातील आहेत. त्यामुळे त्या काळातील व्यवहारात त्यांच्या सहभागाचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय मूळ गुन्ह्यात त्यांना आरोपी म्हणूनही समाविष्ट करण्यात आले नव्हते.
युक्तिवाद व पुराव्यांची छाननी केल्यानंतर न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने नमूद केले की, मालपानी यांनी कोणतीही निष्काळजीपणा केलेला नाही किंवा बनावट व्यवहारांची त्यांना माहिती होती, हे दाखवणारा कोणताही ठोस पुरावा नाही. गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा लाभ त्यांना मिळाल्याचेही काही पुरावे उपलब्ध नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा दोष कायम ठेवणारा आदेश रद्द करत मालपानी यांना दोषमुक्त केले. विशेष न्यायालयाने यापूर्वी त्यांच्या दोषमुक्तीची मागणी फेटाळली होती, त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या