Home / महाराष्ट्र / मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार! संजय राऊतांची घोषणा

नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही बंधूंनी युतीबाबत संकेत दिले असेल तरी अद्याप थेट भाष्य केलेले नाही. मात्र आज पहिल्यांदाच उबाठा खासदार संजय राऊत जाहीरपणे म्हणाले की, मुंबई , ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक या पालिकांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार आहेत. नाशिकमध्येसुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी अनेक महापालिकांत आम्ही एकत्र लढू. या प्रकरणी आमची चर्चा सुरू आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची ताकद म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे. आता कोणतीही दुसरी ताकद किंवा अघोरी शक्ती आली, तरी मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र दुर्बळ आणि कमकुवत व्हावा यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारख्या प्रवृत्ती महाराष्ट्र आणि मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. स्वाभिमानाच्या प्रश्नावर मराठी माणूस लढायला उठू नये असे त्यांना वाटते. पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. कधी काय खायचे, काय प्यायचे आणि कधी तलवार उपसायची हे आम्हाला ठाऊक आहे. ती तलवार ठाकरे बंधूंनी उपसली आहे आणि त्यातून महाराष्ट्राची मर्दानगी उसळून बाहेर येईल.