Home / महाराष्ट्र / मुसळधार पावसामुळे पालिकांच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

मुसळधार पावसामुळे पालिकांच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल

पिंपरी – राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड, मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उरण या भागांमध्ये...

By: Team Navakal

पिंपरी – राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड, मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उरण या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले त्यामुळे रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला. या पावसाने पालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीचे तीनतेरा वाजवले. शहरांमध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांची चांगलीच पोलखोल झाली. काही भागांत पाणी एवढ्या प्रमाणात साचले की दुचाकी वाहनेदेखील वाहून गेली.

पिंपरी चिंचवड शहरात सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी वाहून गेल्या. टेल्को रोड, लांडेवाडी, हिंजवडी आणि भोसरी एमआयडीसी या भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरात ड्रेनेज लाईन आणि नालेसफाईची कामे योग्यरीत्या झाली नसल्यामुळे आयटी पार्कची अवस्था वॉटर पार्कसारखी झाली होती. पावसाळी नियोजनाच्या नावाखाली केवळ बैठका आणि प्रसिद्धीपुरतेच काम चालू असल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली . त्यांनी म्हटले की, या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था आहे की नाही, अशी शंका वाटते. वेळेत नालेसफाईसारखी कामे होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीने तातडीने लक्ष घालून दीर्घकालीन उपाययोजना कराव्या.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आज जोरदार पाऊस झाला. लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर, पवई आणि भांडूप या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाने तीन तासांसाठी रेड अलर्ट जाहीर केला होता. कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे मात्र, आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. काही तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पुन्हा तासभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) नालेसफाईच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडले. डोंबिवली पश्चिमेकडील एच वॉर्ड शेजारील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या रस्त्यावर दरवर्षी पावसात पाणी साचते, तरीही केडीएमसीकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. उरणमध्येही आज मुसळधार पाऊस पडला. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Web Title:
For more updates: , , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या