विजय मेळावा ही सुरवात आहे! उद्धव-राज यांचे दुसरे खुले निमंत्रण

मुंबई – त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माघारीनंतर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी ५ जुलै रोजी वरळी एनएससीआय डोम येथे एकत्र विजय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून जास्तीत जास्त मराठीप्रेमींना मेळाव्याला उपस्थित राहावे, असा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारे उद्धव आणि राज ठाकरे यांची नावे असलेले दुसरे निमंत्रण आज प्रसिद्ध करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला. हा मेळावा कुठल्याही परिस्थितीत यशस्वी करायचा, असा चंग ठाकरे बंधूंनी बांधला आहे.

५ जुलैच्या मेळाव्यासंबंधांत काल आवाज मराठीचा या नावाने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंची नावे होती. आज ठाकरे बंधूंचे संयुक्त दुसरे संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात लिहिले आहे की, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहणे हेच स्वप्न आहे? ही सुरवात आहे! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे आपल्याला खुले जाहीर आमंत्रण आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पत्रावर कुठल्याच पक्षाचे नाव नाही.

या पत्रांमुळे उबाठा-मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह असून राज आणि उद्धव या यांची छायाचित्रे असलेले टी- शर्ट त्यांनी खास तयार केले आहेत. दरम्यान, उबाठा आणि मनसेच्या नेत्यांनी आज एकत्र वरळी येथील मेळावा स्थळाची पाहणी केली. त्यात उबाठाकडून आमदार अनिल परब, आ. सुनील शिंदे, आशिष चेंबुरकर, साईनाथ दुर्गे अखिल चित्रे आणि मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि यशवंत किल्लेदार सहभागी होते. त्यांनी डोमची अंतर्गत व्यवस्था आणि सुरक्षा यांचा आढावा घेतला.

या पाहणीनंतर मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले की, या विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवांना निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या टीमने एकत्रित पाहणी केली. ही जागा कार्यक्रमाला कमी पडेल याची आम्हाला जाणीव आहे. परंतु कार्यक्रमाच्या नियोजनाची एकत्रित चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व पक्षांना निमंत्रण दिले आहे. भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट या महायुतीचे घटक असलेल्या पक्षांच्या नेत्यानांही निमंत्रण दिले आहे. येतील त्यांचे स्वागत केले जाईल. हा लढा मराठी माणसाचा आहे. उबाठाचे अनिल परब म्हणाले की, मराठी माणसाचा विजय झाला आहे, तो साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आम्ही कोणतेही राजकीय भाष्य या व्यासपीठावर करणार नाही. जिथे राजकीय व्यासपीठ आहे तेथे राजकीय विषयांची उत्तरे दिली जातील. हा आम्ही मराठीच्या विजयाचा जल्लोष साजरा करणार आहोत. या जल्लोषात आम्ही कोणताही राजकीय विषय आणू इच्छित नाही.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात
नवा शासन निर्णय जारी

त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन जुने शासन निर्णय रद्द केल्यानंतर राज्य सरकारने आता नवी अधिसूचना जीआर जारी केला आहे. से म्हटले आहे. नवीन अधिसूचना जारी करण्यात आल्याने पूर्वी १६ एप्रिल व १७ जून रोजी काढलेले दोन शासन निर्णय औपचारिकपणे रद्द झाले आहेत. नव्या अधिसूचनेनुसार, त्रिभाषा सूत्राच्या पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती याआधीच्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करणार आहे. शिफारसी सादर करण्यापूर्वी ही समिती संबंधित व्यक्ती, शैक्षणिक संस्था व संघटनांशी संवाद साधणार आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.