मुंबई – राज्यात आज कृषीदिन साजरा होत असताना 12 जिल्ह्यांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी एकवटले. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला जोरदार विरोध केला. या शेतकरी आंदोलनाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शक्तिपीठ रद्द, सरकार भकास असे फलक दाखवत आंदोलनही करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ प्रकल्पाला विरोध केला. कोल्हापुरात सकाळी 10 वाजताच्या सुमारास शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी एकत्र आले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावर रास्ता रोको केला होता. पोलिसांनी मात्र शेट्टी यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवून आंदोलन मागे घेण्याची नोटीस बजावली. परंतु त्यांनी मात्र सरकारच्या दबावाला न जुमानता आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनावेळी काही शेतकऱ्यांनी नदीपात्रात उड्या मारण्याचा प्रयत्न केला. सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी आमच्या जमिनी काढून घेत आमच्या उपजीविकेचे साधनच नष्ट करत आहे. मग आम्ही कशाला जगू? असा सवाल त्यांनी केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना अडवले. यावेळी शेतकऱ्यांनी एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, किसान काँग्रेसचे सागर कोंडेकरही सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गही रोखून धरला होता.
धाराशिवमधील शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने या मार्गावर सुमारे 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शक्तिपीठ महामार्गासाठी धाराशिव तालुक्यातील 17 गावे आणि तुळजापूर तालुक्यातील 2 गावे असे मिळून 19 गावांतील जमिनीचे भूसंपादन केले जात आहे. या दोन तालुक्यांतून 46 किमीचा मार्ग जाणार आहे. रत्नागिरी- नागपूर महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज, असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी केला. येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी तहसीलदार मृणाल जाधव यांनी चर्चा केली. पण शेतकरी आंदोलनावर ठाम होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. लातूर जिल्ह्यात महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध केल्याने प्रशासनाने आजची मोजणी थांबवली. पोलिसांनी ठिकठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समिती, सांगलीच्या वतीने सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात खासदार विशाल पाटीलही सहभागी झाले. त्यांनी सरकारच्या भूमी अधिग्रहणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. ते म्हणाले की, हे आंदोलन फक्त रास्त मागण्यांसाठी नाही तर हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जात आहे. ज्यांच्या कष्टावर देश उभा राहतो, त्यांचे भविष्य सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे अंधारात लोटले जात आहे. विकासाच्या नावाखाली जर शेतकरीच उघड्यावर पडत असेल तर असा विकास स्वीकारणे अशक्य आहे. शासनाने विकासाची दिशा ठरवताना शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे गरजेचे आहे. जमीन जात असेल, तर न्याय्य भरपाई पाहिजे. पुनर्वसनाची स्पष्ट हमी आणि शक्य असल्यास, जमिनीचा पर्यायदेखील द्यावा. अन्यथा ही असंतोषाची ठिणगी पेटून मोठे आंदोलन होईल, याची सरकारने नोंद घ्यावी.
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत. त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी. शक्तिपीठ रद्द करावा, असे साकडे घालण्यासाठी मीदेखील पंढरपूरला जाणार आहे. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेतजमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफणीद्वारे ड्रोन फोडू.
हा विषय आज विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले की,आज कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. आपण एकीकडे कृषिदिन साजरा करत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आजच्या दिवशी सरकारने घ्यायला हवी. दुर्दैवाने आजच्याच दिवशी शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग सरकारने रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.
या शेतकरी आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला. त्यांनी सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सतेज पाटील, आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. त्यांनी शक्तीपीठ रद्द, तीन पक्षांचे सरकार भकास असा मजकूर लिहिलेली पोस्टर त्यांनी हाती
घेतली होती.
