शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह व पक्ष कोणाचे? ऑगस्टमध्ये सुनावणी! नोव्हेंबरमध्ये निकाल!


नवी दिल्ली- गेली दोन वर्षे ज्या खटल्याची एकही सुनावणी झाली नाही तो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आला आणि अवघ्या 5 मिनिटांत सुनावणी संपली! मात्र सर्वोच्च न्यायालयाने उबाठा गटाला दिलासा देत जाहीर केले की, या प्रकरणाची 20 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होईल. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत निकाल लागणार हे निश्चित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी या वादाचा निकाल लागणार आहे.
शिवसेना पक्ष व चिन्ह कुणाचे याबाबत गेली दोन वर्षे एकही सुनावणी झाली नाही. त्यामुळे ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. या याचिकेत असेही म्हटले होते की, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ज्याप्रमाणे चिन्ह व नाव वापरताना हे प्रकरण न्यायालयात असल्याची नोंद प्रत्येक वेळी करण्याचे
निर्देश न्यायालयाने दिले आहेत तसेच
निर्देश शिंदे गटाला द्यावेत. या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर निर्णय व्हावा, अशीही विनंती केली आहे. ठाकरेंच्या वकिलांनी याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी 2 जुलै रोजी केली होती. त्यानंतर आज न्यायालयात युक्तीवादाची शक्यता होती. मात्र आजची सुनावणी काही मिनिटातच आटोपली. शिंदे गटाने याचिकेवर आक्षेप घेत ठाकरे गटाने दोन वर्षांपासून कोणतीच हालचाल केली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर न्या. सूर्यकांत यांनी ऑगस्टमध्ये सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. मात्र, नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हे प्रकरण आम्हाला आता संपवायचे आहे, असे स्पष्ट वक्तव्य करत वादावर लवकर निकाल देण्याचे संकेत न्यायालयाने दिले. त्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे आता निवडणुकीपूर्वी निकाल लागून शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाच्या ताब्यात जाणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून लवकर निकाल लागण्याचे संकेत दिल्याने ठाकरे गटाला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात स्पष्ट विधान केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता थांबवा. कारण, हे प्रकरण मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलाच पाहिजे. त्यासाठी मुख्य सुनावणी ऑगस्टमध्ये घेऊ. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारीख मागितली. 20 ऑगस्ट रोजी ही सुनावणी पूर्ण झाल्यास पक्ष व चिन्हाच्या मालकीबाबत अंतिम निर्णय नोव्हेंबरमध्ये लागू शकतो. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी याचिकेवर आक्षेप घेत म्हटले की, ही याचिका इतक्या उशिरा का दाखल केली? मागील दोन वर्षांपासून याचिकाकर्ते झोपा काढत होते का? मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावाच लागेल.