BJP – नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत 100 नगरसेवक व 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. मात्र हे सर्व भाजपाचेच (BJP )कसे असा सवाल विरोधी पक्ष करीत आहेत. धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषद आणि सोलापुरातील अनगर नगरपंचायत भाजपाने मतदानाआधीच जिंकली आहे. बिनविरोध निवडून येणारे सर्व भाजपा नेत्यांचे नातेवाईक आहेत. याबाबत विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उबाठा नेते अंबादास दानवे म्हणाले की, भाजपाला सत्तेचा माज चढला आहे. प्रचंड दबावतंत्र आणि सत्तेचा गैरवापर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुरू आहे. 100 नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांचे नेते, प्रवक्ते करत आहेत. भाजपा नेत्यांचे नातेवाईकच बिनविरोध कसे निवडून येतात? एखादा सामान्य उमेदवार नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून का येत नाहीत?
जळगावच्या जामनेर नगरपरिषद निवडणुकीचे उदाहरण विरोधकांनी दिले आहे. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. या नगरपरिषदेत भाजपाचे 9 नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीमागे भाजपाने साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर केला. उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज एक्स पोस्ट करत म्हटले की, भाजपाचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेले, यात वंचित व समविचारी पक्षांचे उमेदवार होते. त्यांना अर्ज मागे घ्यायला लावून निवड बिनविरोध केली. ही बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती आहे. बिनविरोधसाठी एवढा अट्टाहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा. दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा. त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश द्यावा. गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन, नेत्यांच्या कुटुंबियांना नगरपरिषदांचे इनाम अशी भाजपाची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना आहे.
जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या सहा मुस्लीम उमेदवारांवर तर अर्ज भरल्यावर अज्ञातस्थळी जाण्याची वेळ आली होती. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतरच ते परतले. शरद पवार गटाने असा आरोप केला होता की, या उमेदवारांना विविध प्रलोभने दाखवून आणि दबाव टाकून अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जात होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत एक उमेदवार जावेद मुल्ला म्हणाले की, आमच्यावर दबाव कोण टाकत होते, हे सर्वांना माहीत आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आम्ही त्यांची नावे जाहीर करू.
हे देखील वाचा –
बेंगळुरूमध्ये एटीएम चोरी; पोलिस अधिकारी आणि कॅश व्हॅन इन्चार्ज अटकेत; ५.७ कोटी रुपये जप्त
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू









