19 वर्षांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र! इतिहास घडला‌! ‘एकत्र आलोय, एकत्र राहणार!‌’ महाराष्ट्र आनंदला


मुंबई- महाराष्ट्रातील मराठी माणसाचे ऊर आज आनंदाने भरून आले! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाली! मराठी माणसांच्या दबावामुळे 19 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले! एकत्र आलोय, एकत्र राहणार आणि भाजपाला बाहेर फेकून देणार, ही गर्जना दोघा भावांनी मंचावरून केली तेव्हा सभागृहात अक्षरशः जल्लोष झाला. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी वरळी डोमच्या सभागृहात आणि बाहेर जी तुफान गर्दी उसळली होती ती या क्षणाचे साक्षीदार बनून धन्य झाले. उद्धव आणि राज ठाकरेंनी हातात हात घेतले, अमित आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली! हे दृश्य पाहायला बाळासाहेब हवे होते. हा क्षण खूप आधी यायला हवा होता, ही युती पालिकेसाठी झाली अशा अनेक चर्चा सुरू आहेत आणि सुरूच राहतील, पण हा क्षण आल्याने मराठी माणसाला हर्ष झाला हे नक्की!
या युतीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्त्वाखाली आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. ठाकरेंची पालिकेवर 25 वर्षे सत्ता असताना त्यांनी मात्र काहीच केले नाही. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, एकाने मराठी भाषेबाबत तळमळ दाखवली, दुसऱ्याने सत्तेसाठी मळमळ दाखवली. मात्र राज ठाकरेंचे कौतुक केले. अजित पवारांनी नेहमीप्रमाणे सावध राहत प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेस तर या राजकीय घडामोडीबाबत सतर्क आहे की नाही अशी शंका वाटावी इतका थंड राहिला. शरद पवारांनी सुप्रिया सुळे व जितेंद्र आव्हाडांना कार्यक्रमालाच पाठविल्याने त्यांचा पाठिंबा उघड झाला.
19 वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहोत
बाळासाहेबांना जमले नाही! फडणवीसांना जमले

राज ठाकरे म्हणाले की,
सन्माननीय उद्धव ठाकरे (टाळ्या) आणि माझ्या मराठी बंधू, भगिनींनो व मातांनो (टाळ्या, ठाकरे-ठाकरे गजर)
आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा एकवटतो याचे चित्र उभे राहिले असते, (टाळ्या) पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. (शिट्या), आज मैदानात मेळावा व्हायला हवा होता (जल्लोष), मी मुलाखतीत म्हटले होते की, वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. (टाळ्या) आज 19 वर्षांनंतर मी व उद्धव एकत्र येत आहोत, जे बाळासाहेबांना जमले नाही, अनेकांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमले. (प्रचंड जल्लोष), संध्याकाळी आता सगळं सुरू होईल, दोघांची देहबोली कशी होती, मूळ विषय सोडून इतर गोष्टीत रस घेतात.
कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचे नाही (मराठी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची गर्जना) हा प्रश्नच अनाठायी होता. हिंदी कशासाठी, लहान मुलांवर जबरदस्ती करतात.
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात (टाळ्या) आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर (टाळ्या)दोन पत्र लिहिली, दादा भुसे आले. म्हणाले, ऐकून तर घ्या, मी म्हटले ऐकतो. पण ऐकून घेणार नाही, कुठले त्रिभाषा सूत्र आणले? केंद्र व राज्य सरकारना सोपे जावे म्हणून त्रिसूत्र आणले, पण सगळीकडे इंग्रजी वापरताना, त्रिसूत्र भाषेचे कुठल्याही राज्यातही नाही, दक्षिणेचे विचारत नाहीत म्हणून महाराष्ट्रात प्रयोग केला. पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडते ते आज राज्यकर्त्यांना कळले असेल, म्हणून माघार घेतली. हिंदी भाषिक राज्ये आर्थिक मागास आहेत. त्यांना हिंदीतून राज्य करता आली नाहीत, विकास करता आला नाही, ती माणसे इकडे येतात, मग हिंदी का शिकायचे. अमित शहा म्हणाले की, ज्यांना इंग्रजी येते त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणायला. अरे तुम्हालाच येत नाही. आम्ही सव्वाशे वर्षे राज्य केले, आम्ही मराठी लादली नाही. हिंदी 200 वर्षांपूर्वीची भाषा, महाराजांच्या काळातही नव्हती, आता सक्ती कशासाठी? त्यांनी मुंबई स्वतंत्र करता येते का ते चाचपडून पाहिले, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे पाऊल टाकू, असे त्यांना वाटले. मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत, पण गांडू नाही आहोत (आरोळ्या).
ठाकरेंची मुले इंग्रजी भाषेत शिकली, भुसे मराठीत शिकून शिक्षणमंत्री झाले, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले.
एकेकाचे हिंदी ऐका फेफरं येईल (हास्याचा फवारा) आम्ही मराठीत शिकलो, मुले इंग्रजीत शिकली, माननीय बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे इंग्रजीत शिकले, त्यांच्या मराठी प्रेमाबद्दल शंका घेऊ शकता का? आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल इंग्रजी मिशिनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्त्वाबद्दल शंका घेऊ का? उद्या मी हिब्रूत शिकेन आणि मराठीचा अभिमान ठेवीन, काय प्रॉब्लेम आहे? (टाळ्या)
जयललिता, पवन कल्याण, कन्निमुळी, कमल हसन, सूर्या, ए. आर. रेहमान हे सर्व इंग्रजीत शिकले. रेहमान व्यासपीठावर होता, तेव्हा निवेदिका तामिळ भाषेत बोलत होती. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्यावर रेहमान मंच सोडून खाली उतरला. कडवटपणा हा आतमध्ये असावा लागतो. बाळासाहेब इंग्रजीत शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रात कार्टून काढायचे, पण मराठीचा अभिमान सोडला नाही. म्हणे भाषा बांधून ठेवते, कुठची भाषा? आपल्या लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत. हे सर्व वेगवेगळ्या प्रांताचे आहेत. तरी एकत्र लढता. मग भाषा बांधून ठेवते याचा
अर्थ काय?
आज तुम्ही सर्वजण मराठी म्हणून एकत्र आलात, पण मी सांगतो की, ते आता तुम्हाला जातीत विभागायला सुरुवात करतील. मराठी म्हणून एकत्र येऊ देणार नाहीत. काल व्यापाऱ्याला मारले तो गुजराती म्हणून मारले नाही. विनाकारण मारायची गरज नाही, पण मराठी आले पाहिजे, नाही तर कानाखाली वाजवलेच पाहिजे. (टाळ्या)असे मारताना व्हिडिओ काढू नका. आपल्या आपल्यातच राहिले पाहिजे. मी महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट आहे.
1999 साली सेना-भाजपाचे सरकार येणार नाही अशी स्थिती होती. पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. चर्चा सुरू होती, चर्चेत काही होईना, एक दिवस प्रकाश जावडेकर व काही मंडळी बाळासाहेबांना भेटायला आली. त्यावेळी मी मातोश्रीवर होतो. ते मला म्हणाले की, बाळासाहेबांना सांगा सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे ठरविले आहे. मी वर गेलो बाळासाहेब झोपले होते, त्यांना उठवले, त्यांना निरोप सांगितला, त्यावर ते म्हणाले, त्यांना सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. तेव्हा कळले की मराठीसाठी त्यांनी सत्तेवर लाथ मारली. त्यांचा हा अनुभव असताना मराठीवर तडजोड होईल का? ही एकजूट कायम राहावी, महाराष्ट्रात बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार व्हावे.
(हे भाषण झाल्यावर दोघे भाऊ हसत, गप्पा मारताना दिसले.)
‌‘म‌’ पालिकेचाच नाही, महाराष्ट्राचाही आहे
आम्ही दोघे मिळून भाजपाला फेकून देणार

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की,
बऱ्याच वर्षांनंतर राज व माझी भेट मंचावर झाली. त्याने मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हटले आहे, त्याचेही कर्तृत्त्व आपण सर्वांनी पाहिले आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना म्हणतो, सन्माननीय राज ठाकरे व माझ्या तमाम मराठी बंधू, भगिनींनो, राजनी भाषणात अप्रतिम मांडणी केली. माझ्या भाषणाची आता आवश्यकता आहे असे वाटत नाही. आज भाषणापेक्षा आम्ही एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे (टाळ्या) ज्यांनी मराठीसाठी एकजूट दाखवली त्या सर्वांना धन्यवाद.
आमच्यातील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला (टाळ्या, शिट्या), एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी (प्रचंड टाळ्यांचा गजर), आज अनेक बुवा, महाराज व्यग्र आहेत. कुणी रेडे कापतोय, कुणी लिंबू कापतोय, पण तुमच्या सर्वांविरुद्ध आजोबांनी लढा दिला, त्यांचे वारसदार म्हणून आम्ही समोर उभे ठाकलो आहोत.
मधल्या काळात मी आणि राजने त्यांचा अनुभव घेतला आहे. वापरा आणि फेकून द्या हा त्यांचा खेळ आहे. पण आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत (टाळ्या, शिट्या). राजने सर्वांची शाळा काढली, पण मोदींची शाळा कोणती? फडणवीस म्हणतात भाषेच्या विषयावर गुंडगिरी चालू देणार नाही. जर मराठी माणूस न्याय मागायला रस्त्यावर उतरत असेल आणि त्याला गुंड म्हणत असाल तर होय, आम्ही गुंड आहोत (टाळ्या). तुम्ही नुसते नावाने मराठी आहात, पण तुमचे मराठी रक्त आहे का ते तपासावे लागेल. संयुक्त महाराष्ट्र आपण लढून घेतला.
हे राजकीय बाटगे आहेत. दिल्लीला जाऊन आले की, ते महाराष्ट्राचे शत्रू बनतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी जेवढा लढा सुरू होता तेव्हा स. का. पाटील म्हणाले होते की, ‌‘यावश्चंद्र दिवाकरो‌’ मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. पण मराठी माणसाने ती लढून मिळवली.
त्यांचे एक एक सुरू आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक, आता एक भाषा असे प्रयत्न सुरू आहेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली त्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर काही कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही होत? आता तो भेडिया बोलतो ती त्यांची पिलावळ आहे. शिवसेनेने काय केले असे म्हणतात.
शिवसेना म्हणजे राज तुला मी त्यात धरतो. तेव्हा तू शिवसेनेत होतास, आता पुढे आपण एकत्र असणार आहोत. आम्ही मराठी माणसांना बाहेर घालवले म्हणतात, मग तुम्ही सर्व उद्योगधंदे बाहेर नेले, आमचे सरकार पाडले, तिकडे बसलेल्यांचे बूट चाटले. आपली भांडणे लावतात, आताही तेच प्रयत्न करणार आहेत. आज हा ‌‘म‌’ मराठीचा नाही, पालिकेचा आहे असे म्हणतात. पण हा ‌‘म‌’ केवळ पालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. आपली एकजूट ही ताकद आहे. संकटावेळी एकत्र येतो, मग फुटतो. यावेळी ते होऊ द्यायचे नाही, हे फूट पाडतात आणि बटेंगे तो कटेंगे ही भीती पसरवतात. आपापसात
भांडणे लावतात.
आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. आही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण सक्ती केली तर शक्ती दाखवू. भाजपाचे
स्वतःचे काहीच नाही. कोणत्याच लढ्यात हा पक्ष नव्हता. शिवसेनाप्रमुखांचा डोक्यावर हात नव्हता तेव्हा महाराष्ट्रात यांना कोण ओळखत होता?
यांच्याकडून आम्ही देशाचा, महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा? आमच्यात भांडणे लावून मुंबई अदानीच्या घशात घालायची? हे राजकारणातील व्यापारी आहेत. आपला मालक आला म्हणून गद्दार जय गुजरात म्हणाला. हे म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असेल का? महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे.
आत्ताच विचार करा. डोळे उघडा, नीट बघा. कारण आता जर संधी गमावली तर भविष्यात अशी संधी तुम्हाला कधीच मिळणार नाही. मराठी आईची मुले असे तुम्ही स्वतः म्हणवून घेऊ शकणार नाहीत.
तो भाजपात असला तरी एकत्र आला पाहिजे. आजपासून सुरुवात झाली आहे. आम्ही दादागिरी केली नाही, पण कुणी केली तर सहन करणार नाही. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका.
भाजपा ही अफवांची फॅक्टरी आहे, मी हिंदुत्व सोडले असा ते माझ्यावर आरोप करतात. पण सांगतो, आम्ही हिंदुत्व कदापि सोडणार नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदू आहोत. 1992-93 साली देशद्रोही माजले होते. तेव्हा मराठी माणसांनी मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवले.
काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. एक देश, एक न्याय आणि एक निशाण ही आमची भूमिका होती आणि आहे. एक निशाण याचा अर्थ तिरंगा. भाजपाचे भांडी पुसण्याचे फडके नव्हे. आता त्यांनी वन नेशन सुरू केले आहे. हिंदू आणि हिंदुस्तान आम्हाला मान्य आहे. पण महाराष्ट्रात हिंदीची सक्ती यांच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी होऊ देणार नाही. 2014 पासून मुंबईचे लचके तोडले जात आहेत. मोठ-मोठे उद्योग, हिरे व्यापार, महत्त्वाची सरकारी कार्यालये गुजरातला घेऊन गेले. हिंदुस्तान फक्त गुजरातपुरताच आहे का?
हिंदू आणि मुसलमानांना लढवले. महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये फूट पाडली. गद्दारी करायला लावून आमचे सरकार पाडले. दिल्लीच्या नेत्यांचे बूट चाटण्यासाठी गद्दारी करण्यात आली. हरियाणात जाट विरुद्ध जाट लढवले. दिल्लीचे गुलाम महाराष्ट्रावर राज्य करत आहेत. देशातील सर्वात कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्राचा आहे. इकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मोदी जगभर फिरत आहेत. स्टार ऑल छाता पुरस्कार घेत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे.
मला मुंबईत मराठीचे स्वतंत्र दालन करायचे होते. त्याचा आराखडा मंजूर झाला होता. मी मुख्यमंत्री असताना त्याचे भूमिपूजन केले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आताही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, पण मराठी दालन रद्द करण्यात आले आहे. हे यांचे मराठी प्रेम आहे. अशांना मराठी माणसाची अशी शक्ती दाखवायची आहे हे त्यांना पुन्हा डोके वर काढता येऊ नये. मी म्हणतो भाजपावाल्यांना आपल्या लग्नातही बोलवू नका. ते तुमच्या जेवणार यथेच्छ ताव मारतील आणि नवरा बायकोत भांडण लावून देतील. स्वतः दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. प्रसंगी त्या नवरीलाच पळवून नेतील.