21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अलर्ट

Heavy Rains Likely In Parts Of Maharashtra

Heavy Rains Likely In Parts Of Maharashtra | पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काल (20 मे) प्रचंड पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. पुढील काही दिवसात राज्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे (cyclonic circulation), महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 21 ते 24 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre, Mumbai) यांनी मंगळवारी सायंकाळी याबाबत एक बुलेटिन जारी केले. त्यानुसार, 22 मे च्या आसपास याच भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, तो उत्तरेकडे सरकून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढू शकते.

या हवामान प्रणालीमुळे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह राज्याच्या काही भागांना फटका बसण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या. “काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह 30-40 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने वारे वाहू शकतात आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असे भुते यांनी सांगितले.

गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर.

वादळी वारे, विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम.

वादळी वारे, विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव.