Shinde Sena is angry. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदारांसह शिवसेनेत फूट पाडून भाजपाबरोबर सत्तास्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ‘50 खोके एकदम ओके’ ही घोषणा लोकप्रिय करून शिंदेसेनेच्या आमदारांवर प्रत्येकी 50 कोटी रुपये खाल्ल्याचा जाहीर आरोप वारंवार केला. शिंदेसेनेला डिवचण्यासाठी उबाठा आणि विरोधक आजही संधी मिळेल तेव्हा 50 खोक्यांचा उल्लेख करत असतात. या घोषणेवरून शिंदेसेनेने आपला संताप अनेकदा व्यक्त केला आहे. मात्र, आता मुंबई पालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करताना भाजपा कार्यकर्त्यांनीच ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा जोरात दिल्या. त्यामुळे शिंदे गट चांगलाच खवळला आहे.
सायन कोळीवाडा येथील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपाच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे अशी महायुतीतील मित्रपक्षांमध्येच लढत आहे. विशेष म्हणजे शिंदे गट-भाजपाच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 हा शिंदे गटाला सुटला होता. त्यानुसार शिंदे गटाने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपाच्या शिल्पा केळुस्कर यांनीही भाजपाचा रंगीत झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो वैध ठरल्याने येथे मैत्रीपूर्ण लढतीला संमती देण्यात आली. मात्र यामुळे दोन्ही पक्षांत कटुता आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि आयोगापर्यंत पोहोचले होते.
आज सकाळी प्रचारफेरी सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच परिसरात एकत्र आले. सुरुवातीला वातावरण शांत होते. मात्र अचानक भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी माईकवरून ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा आता थेट मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिली गेल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकाराबाबत शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजपाचे हे कोण महारथी आहेत, ते पाहावे लागेल. अशा घोषणा देण्यापूर्वी फडणवीसांना विचारा. आमच्या बंडखोरीमुळेच तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे अशा घोषणा देताना विचार करा. ज्यांनी या घोषणांची सुरुवात केली, तेच लोक आता ती घोषणा विसरले आहेत. ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांची भाषा कुठे गेली, याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनीही भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपाचे लोक नागरिकांची दिशाभूल करणारी भाषणे करत आहेत. ज्यांनीस्वतःच्या पक्षाची फसवणूक केली, चोरी करून खोटा एबी फॉर्म तयार केला, अशा व्यक्तींनी जास्तबोलणे योग्य नाही. त्यांच्या स्वतःच्या पक्षानेच त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या वादाबाबत भाजपाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या घोषणांबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तर याबाबत बोलताना उबाठाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, त्यांनी जे पेरले होते, तेच आज उगवत आहे. ‘50 खोके एकदम ओके’ या घोषणा आधी आम्ही देत होतो. आता त्यांचे मित्रपक्ष भाजपाकडून दिल्या जात आहेत. मध्यंतरी मराठवाड्यातील हिंगोलीच्या एका आमदारानेही शिंदे गटाविरोधात अशाच घोषणा दिल्या होत्या.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
गोकुळवर महायुतीची करडी नजर; विश्वास पाटीलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश









