Kirit Somaiya – महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण्यांचा हिडीस चेहरा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. सत्तेसाठी वाट्टेल तशा आघाड्या-युतीमधून राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचे दर्शन घडले. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. उबाठावर सातत्याने जहरी टीका करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाचा विजय सोपा व्हावा म्हणून उबाठा आणि मनसे यांनी त्याच्या विरोधात उमेदवारच दिला नाही. किरीट सोमय्यांचे ( Kirit Somaiya) पुत्र माजी नगरसेवक नील सोमय्या मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात उबाठाने तगडा उमेदवार देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात उबाठा-मनसे युतीने या प्रभागात उमेदवारच दिला नाही. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जही बाद झाला. तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ही जागा वंचितसाठी सोडली. वंचितने वैशाली सकपाळ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता नील सोमय्या यांचा सामना वैशाली सकपाळ आणि अन्य अपक्ष उमेदवारांशी आहे. त्यामुळे नील सोमय्या यांचा विजय सहज मानला जात आहे. या प्रभागातून 2017 साली नील सोमय्या निवडून आले होते. म्हणजे आता त्यांच्यासमोर आपली ही जागा राखणे एवढेच माफक आव्हान आहे.
सोमय्या पुत्राचा विजय सुलभ व्हावा यासाठी उबाठाने केलेली ही अप्रत्यक्ष मदत आहे. वास्तविक किरीट सोमय्या हे उबाठासाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. त्यांनी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घोटाळ्याचा आरोप केला. अलिबागजवळच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशीरपणे 19 बंगले विकत घेतले, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर या बंगले खरेदी व्यवहारात संगनमत करून कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे (मविआ) सरकार आणि स्वतः उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे मेहुणे ठाण्यातील व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचलनालयाने मोठी कारवाई करत त्यांच्या निलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट जप्त केले. हा उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो. हा घोटाळा उघड करण्यात किरीट सोमय्याच आघाडीवर होते.
उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अनधिकृत बंगल्याचे प्रकरण सोमय्यांनीच लावून धरले होते. त्यांनी विविध यंत्रणांकडे तक्रारी केल्याने अखेर मिलिंद नार्वेकर यांनी तो बंगला स्वतःहून पाडून टाकला.
उद्धव ठाकरे यांचे आणखी एक निष्ठावंत माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्या मुरूड येथील साई रिसॉर्टमधील काही बांधकाम सोमय्यांच्याच पाठपुराव्यामुळे पाडण्यात आले. किशोरी पेडणेकर यांचे झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत कार्यालय आहे, असा आरोप करीत सोमय्या यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या.
उबाठाचे पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही त्यांनी आरोप केले. त्यांच्याकडे एक लाल डायरी सापडली. ज्यात त्यांनी कुणाला काय दिले त्याच्या नोंदी आढळल्या. त्यात एका महागड्या घड्याळाच्या नोंदीपुढे मातोश्री लिहिले होते. ही बाबही सोमय्या यांनी तापवली होती. अशा अनेक प्रकरणांत कधी मीडियात दिलेल्या मुलाखतींमधून, सोशल मीडिया पोस्टमधून तर कधी संबंधित सरकारी अधिकार्यांकडे लेखी तक्रारी करून सोमय्या यांनी उबाठा नेत्यांना अनेकदा अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यानंतर किरीट सोमय्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात उद्धव ठाकरे एखादा तगडा उमेदवार देतील, त्या उमेदवाराला पक्षाचे बळ देऊन नील सोमय्यांचा पराभव करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात उबाठा-मनसे युतीने त्याच्या विरोधात उमेदवारच दिला नाही. शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराचा अर्ज सोयीस्कर बाद झाला. उबाठा, मनसे आणि शरद पवार या तिघांच्या आशीर्वादाने नील सोमय्याचा विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढतात, नेते सेटलमेंट करत मजा मारतात.
————————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
अजित पवारांची भर सभेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
साडेतीन वर्षांनंतर नवाब मलिक पहिल्यांदाच मैदानात; मालिकांची फडणवीसांवर घणाघाती टीका..
बांगलादेशी खेळाडू खरेदीवरून शाहरुख खान अडकला टीकेच्या भोवऱ्यात..












