29 municipal elections – सर्वांचे लक्ष असलेल्या राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांचे (29 municipal elections) बिगुल आज वाजले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. नागपूर, चंद्रपूर आदी ज्या पालिकेत 50 टक्क्यांच्या वर आरक्षण आहे तिथेही न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून निवडणूक होणार आहे. मुंबईत 2017 नंतर आता पालिका निवडणूक होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर आणि चिन्ह वाटप केले जाईल. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.
सह्याद्री अतिथीगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. त्यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीच्या नियमानुसार मतदान रात्री 10 पर्यंत सुरू राहत नाही.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
महानगरपालिकांची नावे
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत. 5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी: छत्रपती संभाजीनगर: 27 एप्रिल 2020, नवी मुंबई: 07 मे 2020, वसई-विरार: 28 जून 2020, कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020, कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020, नागपूर: 04 मार्च 2022, बृहन्मुंबई: 07 मार्च 2022, सोलापूर: 07 मार्च 2022, अमरावती: 08 मार्च 2022, अकोला: 08 मार्च 2022, नाशिक: 13 मार्च 2022, पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022, पुणे: 14 मार्च 2022, उल्हासनगर: 04 एप्रिल 2022, ठाणे: 05 एप्रिल 2022, चंद्रपूर: 29 एप्रिल 2022, परभणी: 15 मे 2022, लातूर: 21 मे 2022, भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022, मालेगाव: 13 जून 2022, पनवेल: 9 जुलै 2022, मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022, नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022, सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023, जळगाव: 17 सप्टेंबर 2023, अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023, धुळे: 30 डिसेंबर 2023, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.
बहुसदस्यीय पद्धत
मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरित्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
‘जातवैधता पडताळणी’बाबत
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जातप्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मनुष्यबळाची व्यवस्था
महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुमारे 290 निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुमारे 870 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे 1 लाख 96 हजार 605 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.
प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम ‘27अअ’ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) अन्वये महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध असतात. त्यामुळे 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 नंतर जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नाही.
राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठका 14 ऑक्टोबर 2025, 01 डिसेंबर 2025 आणि 12 डिसेंबर 2025 रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बहुसदस्यीय पद्धत, विविध न्यायालयांचे आदेश, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था, ईव्हीएमसाठीच्या स्ट्राँग रूमची निगराणी इत्यादींबाबत बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाच्या
‘जोडपत्र- 1’ आणि ‘जोडपत्र-2’ बाबत अधिक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य प्रचारकांची (स्टार कॅम्पेनर) संख्या 20 वरून 40 करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या पत्त्यावरील 150 नावे बोगस नाहीत
मुंबई पालिका आयुक्तांच्या घराच्या पत्त्यावर 150 बोगस लोकांची नावे असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र ती नावे बोगस नाहीत. पालिका आयुक्तांचा पत्ता हा त्या सेक्टरचा पत्ता म्हणून दिला होता. त्यामुळे या 150 जणांचा सेक्टरचा पत्ता तोच होता. हे सर्वजण त्या सेक्टरचे रहिवाशी आहेत, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
स्वच्छतागृहाच्या पत्त्यावर मतदारांची नावे
नवी मुंबईतील स्वच्छतागृहाच्या पत्त्यावर मतदारांची नावे असल्याची तक्रार होती. तेथे जाऊन पाहणी केली असता स्वच्छतागृहाच्या वरच्या मजल्यांवर काही लोक पूर्वी राहत होते. आता ते लोक तेथून निघून गेल्याचे निदर्शनास आले. त्या 10 लोकांची नावे कमी करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
संभाव्य दुबार मतदाराच्या
नावासमोर (**) असे चिन्ह
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी 20 डिसेंबर 2025 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे.
महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार
यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- 1,81,93,666
महिला मतदार- 1,66,79,755
इतर मतदार- 4,596
एकूण मतदार- 3,48,78,017
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. 15,00,000/-
‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – रु. 13,00,000/-
‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. 11,00,000/-
‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व 19)- रु. 09,00,000/-
एकूण मतदान केंद्र- 39,147
जागा व आरक्षित जागा
महानगरपालिकांची संख्या- 29
एकूण प्रभाग-893
एकूण जागा- 2,869
महिलांसाठी जागा- 1,442
अनुसूचित जातींसाठी जागा- 341
अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
रात्रीच्या जेवणासाठी उच्च-प्रथिनेयुक्त हिवाळ्यातील सूप
धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर तुफान राडा..









