Municipal elections – राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या (Municipal elections) निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहेत. या निवडणुका लढवणार्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना अर्जासोबत शहर विकासाचा आराखडा मांडणारा 500 शब्दांपर्यंतचा निबंध सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. इतकेच नव्हे तर मी भ्रष्ट नाही असे शपथपत्रावर लिहून द्यायचे आहे. आयोगाची ही अजब अट ऐकून उमेदवार चक्रावून गेले आहेत.
राज्यात 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत पालिका निवडणूक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
या निवडणुकीची संभाव्य उमेदवारांकडून तयारी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने 17 डिसेंबरला काढलेल्या पत्रकाने उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पत्रकातील ‘ब’ रकान्यात मतदारसंघ विकास योजनेबद्दल काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता केवळ अर्ज नव्हे, तर शहर व मतदारसंघ विकासासंबंधी 500 शब्दांचा निबंध सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडून आल्यानंतर संबंधित मतदारसंघात कोणत्या विकास योजना राबविणार आहेत, याची स्पष्ट मांडणी उमेदवारांना या निबंधात करावी लागणार आहे. उमेदवारांनी विकासाचा आराखडा, नागरिकांसाठी राबविण्यात येणार्या योजना आणि प्रशासकीय पारदर्शकतेबाबतची भूमिका या निबंधात नमूद करणे अपेक्षित आहे, अशीही सूचना करण्यात आली आहे.
निबंधासोबतच उमेदवारांना एक शपथपत्र सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान किंवा निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारे भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणार नाही, असे त्यांना शपथपूर्वक जाहीर करावे लागणार आहे. उमेदवार स्वतः, त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असेही स्पष्टपणे शपथपत्रात नमूद करणे आवश्यक असेल. या नव्या नियमांमुळे नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांना मतदारांकडे जाण्याआधी निबंध लिहिण्याची तयारी करावी लागणार आहे.मात्र, उमेदवारी अर्ज भरताना निबंध आणि शपथपत्र सादर करणार्या उमेदवारांनी निवडून आल्यावर याचे पालन न केल्यास त्यांच्यावर काय कारवाई होणार याबद्दल आयोगाने काही म्हटले नाही.
—————————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..









