Amol mitkari : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सतत नवा संशय व्यक्त करत आहेत. आज त्यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा. विमानाचे पायलट संमोहित होते का? त्यांचा 50 कोटींचा विमा कशासाठी काढण्यात आला होता? असे प्रश्नही मिटकरी यांनी उपस्थित केले. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीचे पायलट दोन वेळा बदलण्यात आले होते. ही कंपनी आधीपासूनच नादुरुस्त होती आणि गेल्या वर्षभरापासून तिच्यावर बंदी होती. तरीही 28 तारखेला तेच विमान अजित पवारांच्या प्रवासासाठी देण्यात आले. दुसरीकडे डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. त्यामुळे पायलट बदलण्यामागे किंवा अपघातामागे काही आर्थिक किंवा अन्य कटकारस्थान आहे का? जर 50 कोटींचा विमा उतरवण्यात आला असेल, तर पायलटला आमिष दाखवण्यात आले होते का? किंवा त्याला संमोहित करण्यात आले होते का? कारण अनेक ठिकाणी संमोहित केलेल्या आत्मघाती हल्लेखोराचा वापर केला जातो.
अजमल कसाब यालाही दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. राजीव गांधी यांची हत्या झाली, त्यावेळीही असा प्रयत्न झाला होता. त्यामुळेच अजित पवारांच्या विमानाच्या पायलटलाही संमोहित करून पाठवले होते का, हा मोठा प्रश्न आहे. कारण पायलटने ‘मे डे’ कॉल दिला नाही. लँडिंगच्या अयशस्वी प्रयत्नानंतर टेक-ऑफ केल्यावर काही वेळातच पुण्यापर्यंत पोहोचता आले असते. पण पायलटने ते केले नाही. यामुळे व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेवर मोठा संशय निर्माण होतो. 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करायला लावले का, याचाही तपास झाला पाहिजे. या प्रकरणी मंगळवारी दुपारी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
अमोल मिटकरी यांनी यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या 10 तारखेच्या पत्रकार परिषदेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, आमदार रोहित पवार अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कुटुंबातील एक सदस्य म्हणून पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मला अपेक्षा आहे ते अनेक गोष्टींबद्दल बोलतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील, ते सादर करतील. त्यामुळेच त्यांची पत्रकार परिषद पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोणी विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आरोप करतो, तर कोणी आत्मघातकी हल्ल्याची भाषा करतो. हा सगळा प्रकार अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची तडफड आहे. अजितदादा आता राहिले नाहीत आणि दुसरीकडे अमोल मिटकरी यांची आमदारकीही संपत आलेली आहे. त्यामुळेच स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे बेजबाबदार आणि केविलवाणे आरोप केले जात आहेत.
मिटकरी यांनी यापूर्वीही, या अपघातात आधी सहा जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली होती. पण घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग सहावी व्यक्ती कोण? एवढा मोठा अपघात होऊनही कागदाचा एकही तुकडा जळालेला का दिसत नाही? विमानाचे पायलट का बदलण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –








