Aaditya Thackeray : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘ऑपरेशन टायगर’ या मोहिमेची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली असून, यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या गुप्त भेटीचे वृत्त फेटाळून लावले असले, तरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या विधानांमुळे या वादाला नवीन तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार सध्या कमालीचे अस्वस्थ असून, ते कोणत्याही क्षणी शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात सामील होतील, असा दावा जाधव यांनी केला आहे.
खासदारांची नाराजी आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा-
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील अंतर्गत धुसफुसीवर बोट ठेवले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी बहाल केल्यामुळे ठाकरे गटातील जुने आणि निष्ठावान खासदार आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड नाराज होते. “ज्या तक्रारी घेऊन आम्ही शिवसेना सोडली होती, त्याच तक्रारी आज तिथल्या लोकप्रतिनिधींच्या आहेत. त्यांना पक्षात योग्य वागणूक मिळत नाही, कोणीही त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यांना सन्मानाने वागवले जात नाही, असे दुःख आमचे मित्र खासदार वारंवार आमच्याकडे व्यक्त करतात,” असे जाधव यांनी नमूद केले.
‘उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्याकडे येतील’
दिल्लीतील आपल्या निवासस्थानी ‘ऑपरेशन टायगर’वर कोणतीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट करत असतानाच, प्रतापराव जाधव यांनी एक सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “ठाकरे गटाचे अनेक नेते सध्या केवळ योग्य संधीची आणि पुढाकाराची वाट पाहत आहेत. आम्ही त्यांना वारंवार सांगतो की, अन्याय सहन करू नका, तुमचे आमच्याकडे स्वागतच आहे. जेव्हा वेळ येईल, तेव्हा उद्धव ठाकरे यांनाही मोठा धक्का बसेल आणि त्यांना आश्चर्य वाटेल असे लोक आमच्या पक्षात प्रवेश करतील.” हे सर्व निर्णय आता केवळ मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संमतीवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अफवा की राजकीय रणनीती? दोन्ही बाजूंकडून इन्कार
बुधवारी ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या सहा खासदारांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. या बैठकीला अन्य दोन खासदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, असाही दावा केला जात होता. मात्र, हे वृत्त पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, एरवी एकमेकांचे नेते फोडण्याचे दावे करणाऱ्या दोन्ही पक्षांनी यावेळी मात्र हे वृत्त फेटाळण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.










