Abhijeet Dipke : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार, वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आंदोलन शनिवारी, ६ जून २०२६ रोजी पार पडले. सकाळी नेमक्या १० वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा अपेक्षित असलेल्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील पाच दिवसांच्या आत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
या आंदोलनाची चर्चा मागच्या बऱयाच दिवसांपासून होती. सध्या अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.या संपूर्ण प्रकरणाला आता एक गंभीर वळण लाभले असून, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की, अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांना अज्ञात घटकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संवेदनशील माहितीमुळे आणि जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अत्यंत सतर्कता बाळगली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि दिपके यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला असलेला धोका टाळता यावा, यासाठी त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी पोलिसांचा सकाळपासूनच चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.










