Sayaji Shinde on Beed Devrai Fire : बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला बुधवारी (24 (डिसेंबर) भीषण आग लागली. काही वेळातच या आगीने संपूर्ण डोंगररांगेला आपल्या कचाट्यात घेतले.
२०१७ पासून ओसाड डोंगर हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या अथक परिश्रमावर या आगीमुळे पाणी फेरले गेले आहे. या आगीत हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती जळून खाक झाल्या असून असंख्य पशू-पक्षांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘निसर्गाच्या घरावर बॉम्ब पडला’ – सयाजी शिंदे
या भीषण आगीनंतर सयाजी शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केले. “गवत जाळल्यानंतर ते पुन्हा चांगले उगवते, हा लोकांचा मोठा गैरसमज आहे. या आगीत सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले आणि झाडे नष्ट होतात. आपल्या घरावर बॉम्ब पडल्यावर जी अवस्था होते, तीच अवस्था आज निसर्गाची झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पालवन डोंगराचा हा परिसर जिथे गवतही उगवत नव्हते, तिथे आम्ही झाडे जगवली होती, पण आज तिथे राख पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना विचारला १५ लाख झाडांचा हिशोब
सयाजी शिंदे यांनी केवळ हळहळ व्यक्त न करता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला.
“बीडमध्ये १५ लाख झाडे लावल्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मग ती झाडे आहेत कुठे? त्यांनी आता उत्तर द्यावे. केवळ कौतुक करून घेऊ नका, त्या १५ लाख झाडांचा हिशोब द्या,” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने कागदोपत्री झाडे लावण्यापेक्षा लावलेल्या झाडांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आगीचे रौद्र रूप आणि मदतकार्य
वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वेगाने पसरली आणि तिने रौद्र रूप धारण केले. वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र, डोंगराळ भाग आणि चढ-उतार असल्याने जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
रात्री उशिरापर्यंत स्थानिक तरुण आणि कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. ही आग नैसर्गिक होती की कोणी जाणीवपूर्वक लावली, याचा तपास आता वन विभाग करत आहे.
सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत १०० देवराई उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. तपोवन आणि सह्याद्री देवराई सारखे प्रकल्प वाचवण्यासाठी नागरिकांनी आणि राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा – Ukraine Russia War : ‘त्याचा मृत्यू होवो!’; झेलेन्स्कींचे पुतिन यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र; युद्ध थांबवण्यासाठी मांडला 20 कलमी प्लॅन









