Aditya Thackeray : राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुकांची (Election) घोषणा करण्यात आली असून राज्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत; तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूनी देखील जोर लावला आहे. त्यासाठी ठाकरे बंधूंची युतीची घोषणा देखील लवकरच होणार आहे.
पुढील आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करायची असल्याने राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची, विविध मेळाव्यांची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार असून; निवडणुकीत युवा मतदारांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी, त्यांचे प्रश्न त्यांचे विविध मुद्दे प्रचारात मांडण्याच्या कामाची जवाबदारी अथवा त्यासाठीची रणनीती आदित्य ठाकरे करणार आहेत.
शिवसेनेत फूट पडण्याआधीपासून आदित्य ठाकरे हे मुंबईसाठी जास्त सक्रिय असल्याचे देखील दिसून आले. त्यानी मुंबई महापालिकेमध्ये विविध प्रकल्प, महापालिकेत सुरू असलेल्या घडामोडींवर विशेष लक्ष ठेवले आहे. महापालिकेतील विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रशासक नेमल्यानंतर महापालिकेतील गोंधळावर वेळोवेळी त्यांनी आवाज देखील उठवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या नेमक्या प्रश्नांची, त्यांच्या अडचणींची जाण आदित्य ठाकरे यांना असल्याने या प्रचारात कोणत्या मुद्द्यांना हात घालायचा? कोणते विषय या प्रचारा दरम्यान मांडायचे? हे आदित्य ठाकरे आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने ठरवताना पाहायला मिळणार आहेत.
या आधी देखील आदित्य ठाकरेंनी राज्य निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार यादीतील घोटाळा अश्या अनेक मुद्द्यांवर आदित्य ठाकरेंनी प्रखरपणे आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जात असताना पक्षातील इतर सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडण्याची तयारी दर्शवल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीत लक्ष घालत असताना आदित्य ठाकरे मुंबईसह तीन ते चार महापालिकांवर लक्ष घालणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईसह नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा आदित्य ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे शिवाय याठिकाणी ते मेळावे देखील घेणार आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्ष, नंतर होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते. त्यामुळे आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वात सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाती घेत पक्षाच्या प्रचाराची धुरा अगदी स्वतंत्र्यपणे सांभाळत आहेत.
राज्यात १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाचं नशीब चमकणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Sanjay Raut on Raj And Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होणार; संजय राऊत आणि अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला









