NCP Manifesto – सत्तेसाठी महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत संपूर्ण देशातच मतदारांना फुकट गोष्टी देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. याचा अर्थ सत्तेत जाताच वारेमाप कमाई होत आहे. या कमाईसाठीच फुकटची खैरात केली जात आहे. या फुकटबाजीने श्रम करणे हे हळूहळू गरजेचे राहणार नाही आणि राज्याची आर्थिक स्थिती बिकट होत जाईल. पण त्याची पर्वा नाही. लोकसभेत पिछेहाट झाल्यावर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. आता फडणवीस, शिंदे हे म्हणे उद्या लाखो रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर करणार आहेत. मग पवार कुटुंब म्हणजे दोन्ही पवार गट मागे कसे राहतील? आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी (NCP Manifesto) सरळ जाहीर केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे आमची सत्ता आली तर आम्ही मेट्रो आणि बस प्रवास सर्व पुणे व पिंपरी-चिंचवड रहिवाशांसाठी मोफत करू!
दोन्ही गटांचा राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा (NCP Manifesto)आज प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर शेजारी बसलेले अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊ-बहीण एकमेकांशी बोलणे तर सोडाच, पण एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नव्हते. दोन्ही राष्ट्रवादीची निवडणूक आघाडी म्हणजे सत्तेसाठी केलेला राजकीय परिस्थितीशी समझोता आहे हे आज अगदी उघड झाले.
राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. यात ‘एक अलार्म पाच काम आणि तीन जादा काम’ ही घोषणा होती. बाकी परंपरेने निवडणुकीत जी आश्वासने दिली जातात ती देताना अजित पवार म्हणाले की, स्वच्छ पाणी, पाण्याच्या उंच टाक्या उभारणे, वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, 150 मॉडेल शाळा आणि सुरक्षितता यावर काम करण्याची माझी तयारी आहे. हा फक्त जाहीरनाम्याचा कागद राहणार नाही, पुण्यात पाणी योजनेसाठी 2,815 कोटी मंजूर करण्यात आले. पण अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्याच बसवण्यात आलेल्या नाहीत ही समस्या मार्गी लावली जाईल. वाहतूक कोंडीमुळे दरमहा साडेसात कोटी रुपयांचे इंधन वाया जाते व वर्षाला 10 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसतो त्यावर उपाय म्हणून मेट्रो प्रवास मोफत आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये बस प्रवास मोफत केला जाईल,
दरवर्षी पुणे महापालिकेला साडेपाच कोटी रुपये त्यासाठी मोजावे लागतील, पण प्रदूषण कमी होईल. स्वच्छतेची मला आवड आहे आणि लोकांना आकर्षित केल्याशिवाय स्वच्छतेत बदल होत नाही. पुण्याची लोकसंख्या 60 लाख इतकी आहे, पण आरोग्य सुविधा अपुरी आहे. सुरक्षित पुण्यासाठी सीसीटीव्ही व पोलीस यंत्रणा सक्षम करू, एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र मोफत सुविधांची घोषणा करताना त्यामुळे पडणारा आर्थिक खड्डा कसा भरून काढणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जरी दोन्ही गट राज्य पातळीवर वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये असले, तरी पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी प्रश्नांसाठी ही युती करण्यात आली.पुणेकरांना दररोज उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. टँकर माफियांचे उच्चाटन आणि सेन्सर-आधारित पाणी गळती शोध यंत्रणा राबवण्याचा आमचा निर्धार आहे. पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीने अष्टसूत्री जाहीर केली असून त्यात खड्डे मुक्त – सुकर प्रवास,नळातून शुद्ध पाणी,नियमित स्वच्छता,हायटेक आरोग्य सुविधा,प्रदूषणमुक्त पुणे, झोपडपट्टींचे पुनर्वसन,जुन्या इमारतींचे पुनर्विकास यांचा समावेश आहे. हे नेहमीचे आश्वासन, कचर्याचा ढीग, पुणे व पिंपरी-चिंचवड रहिवासी हटवतात की मोफत प्रवास सत्तेचा मार्ग सुकर करतो, हे आता पाहायचे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
अयोध्येत सुरक्षेला धक्का; राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्ती अटकेत









