एअर क्रू रोशनी सोनघरे यांच्या पार्थिवावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

roshni songhare funeral

कल्याण – हमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्या एअर क्रू रोशनी सोनघरे (roshni songhare funeral) यांच्यावर आज डोंबिवलीतील (Dombivli)शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूरव श्रद्धांजली वाहिली.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी सोनघरे या फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. त्या डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील (Dombivli’s Rajaji Path)नव उमिया कृपा सोसायटीत राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश यांचा समावेश आहे. सोनघरे कुटुंब आधी ग्रँड रोड परिसरात राहत होते. पण दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. नोव्हेंबरमध्ये रोशनी यांचा साखरपुडा (engaged), तर पुढील वर्षी लग्न ठरले होते. मात्र या अपघाताने सर्व नियोजनांना काळाचा घाला घातला.

घटनेच्या दिवशी आई-वडिलांचा निरोप घेऊन रोशनी अहमदाबादला गेली होती. फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली. पण विमान कोसळून रोशनी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आठवड्याने पार्थिव काल कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. आज सकाळी नव उमिया कृपा सोसायटीतून तिची अंत्ययात्रा निघाली. भावपूर्ण वातावरणात रथातून ही अंत्ययात्रा शिवमंदिर स्मशानभूमीकडे रवाना झाली. अंत्यसंस्कार प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, एअर इंडियाचे (Air India) कर्मचारी, आणि राजकीय नेते उपस्थित होते.