Ajir Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे महाराष्ट्र एका ‘डायनामिक’ नेत्याला मुकला आहे. या दुःखद घटनेवर राज्यातील विविध नेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अजितदादांना अत्यंत भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. “दादा, अशी एक्झिट घ्यायची नव्हती! तुम्ही सर्वांच्या जीवाला चटका लावून गेलात,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पंकजा मुंडे यांच्याकडून आठवणींना उजाळा-
पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. त्या म्हणाल्या की, “अजितदादांचा राजकीय आणि प्रशासकीय व्यासंग (अकॅडमिक सेन्स) जबरदस्त होता. त्यांच्यासोबत केलेला प्रवास, तासनतास चाललेल्या चर्चा आणि गप्पा आजही स्मरणात आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि मिश्किल विनोदबुद्धीने त्यांनी अनेकांना हसवलं, पण आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यांचे लाखो कार्यकर्ते रडत आहेत. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे मी या महान नेत्याला विनम्र अभिवादन करते.” अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अंतिम दर्शनाचे नियोजन-
बारामती ते काटेवाडी अजित पवार यांचे पार्थिव आज रात्री १० वाजेपर्यंत बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, उद्या गुरुवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथे नेण्यात येईल. तेथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजल्यानंतर पार्थिव पुन्हा बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाईल, जिथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती आणि शोकग्रस्त परिवार –
या अंत्यविधीसाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित राहणार आहेत. बारामतीमध्ये सध्या जनसागराचा महापूर लोटला असून, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. या दुर्घटनेत अजितदादांसोबतच त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांनीही प्राण गमावले आहेत. या पाचही मृतांच्या कुटुंबांवर कोसळलेला हा आघात संपूर्ण राज्याला सुन्न करणारा आहे.









