Shashikant Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून महाराष्ट्रात उलट-सुलट दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शरद पवारांसह त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते विलीनीकरणाची चर्चा सुरू होती असे सांगत आहेत. मात्र अजित पवार गटातील नेते ही चर्चा झाली होती, हे मान्य करायला तयार नाहीत. ते विलीनीकरणाबाबत कानावर हात ठेवत आहेत. अशा गोंधळाच्या परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांनी, विलीनीकरणानंतर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अजित पवार यांच्या हाती सोपवण्याचा निर्णय झाला होता, असा दावा करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज पहिल्यांदाच विलीनीकरणाची चर्चा सुरू होती हे मान्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘राष्ट्रवादी’ या नियतकालिकामध्ये अध्यक्षीय मनोगतात शशिकांत शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी या लेखात लिहिले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, त्यावेळी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा आणि नेतृत्वाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे द्यावी, असे सर्वानुमते ठरले होते. पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रचार करणार्या साप्ताहिकातून प्रदेशाध्यक्षांनीच हा दावा केल्यामुळे त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे यांच्या या लेखामुळे अजित पवार यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यावर शरद पवार गटातील नेत्यांचे एकमत होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवार गटातील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्यांसाठी शिंदे यांचा हा दावा पचवणे कठीण होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत तटकरे आणि पटेल यांनी सुरुवातीपासूनच नकारात्मक भूमिका घेतली आहे.
भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हायची तयारी असेल तरच विलीनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अन्यथा चर्चा करणे निरर्थक आहे, अशी भूमिका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने तटकरे यांनी वारंवार मांडली आहे. प्रफुल्ल पटेलांनीदेखील विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती याबद्दल आपल्याला काही माहीत नाही, अशी भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाला सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे आणि पटेल यांचा विरोध आहे, हे यावरून स्पष्ट होते.
शशिकांत शिंदे यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. शिंदे यांनी आपल्या लेखात असा दावा केला होता की, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटेनाटे षड्यंत्र करून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून, वेगळा गट स्थापन करावा लागला होता. यावर संताप व्यक्त करत सुनील तटकरे म्हणाले की, यावर माझा आक्षेप आहे. शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे. जबाबदार जुने सहकारी आहेत. पण अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू पाहत आहेत? त्यांचा हेतू काय? हे मला कळू शकले नाही. ते वारंवार असे विधान करणार असतील तर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला उत्तर द्यावे लागेल.
मुश्रीफ यांची कबुली
अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रथमच विलीनीकरणाची चर्चा सुरू होती हे मान्य करीत आज प्रतिक्रिया देत म्हटले की, अजितदादांकडून विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आम्हाला भाजपाला विश्वासात घ्यावे लागेल. मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती, यावर शिक्कामोर्तब आहे.










