Ajit pawar- महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजित पवार (Ajit pawar) यांनी भाजपाला सत्तेची मस्ती आल्याचा आरोप केला. दुसरीकडे शरद पवारांबाबत मात्र विविध मंचावर प्रशंसेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. काल अजित पवार यांनी भाजपाने सर्व गोष्टीत भ्रष्टाचार करून पालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप केला. यामुळे भाजपा भडकली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या मंचावर व बॅनरवर शरद पवार यांचा फोटो होता आणि त्यावरून अजित पवार यांना हा फोटो फक्त आत्तापुरताच आहे की कायमस्वरूपी राहणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर हसतच अजित पवार यांनी तुझ्या तोंडात साखर पडो असे म्हटले. त्यांच्या या सूचक विधानांनंतर याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पुण्यात विकासकामे केली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेली वाटचाल याचा आढावा घेत भाजपावर सत्तेची मस्ती आल्याचा अजित पवार यांनी केलेला आरोप खूप काही सांगून जाणारा होता. अजित पवार यांनी काल भाजपावर टोकाची टीका केली. भाजपाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने जगातील एक नंबरची पिंपरी-चिंचवड पालिका रसातळाला गेली. भाजपाची दहशत इतकी आहे की, उमेदवार उभे राहायला घाबरतात. ही दहशत कमी करणे जनतेच्या हाती आहे. गेली 9 वर्षे आमच्या हाती पालिकेत सत्ता नाही त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत.
यानंतर भाजपाचे खासदार मोहोळ यांनी टीका केल्यावर अजित पवार म्हणाले की, पुण्यातील एक व्यक्ती घायवळ परदेशात पळून गेला. त्याला पासपोर्ट कुणी दिला ते आठवा. माहिती काढा. पुणे पालिकेत निविदा काढताना अटी आणि शर्थी अशा तर्हेने बदलल्या की, त्यांनी आधीच ठरविलेल्या कंत्राटदारालाच काम मिळेल.
या वक्तव्यांनंतर आज मात्र भाजपाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पत्रकार परिषदेत खडसावले. भाजपा नेते रवींद्र चव्हाण, खासदार मुरलीधर मोहोळ आणि बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हे सरकारमध्ये आहेत. त्यांनी सांभाळून वक्तव्य करावे. आम्ही त्यांना उत्तर देऊ लागलो तर त्यांना कठीण जाईल. मित्रपक्षात मतभेद होऊ नये. अजित पवार यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे नेतृत्व मान्य आहे की नाही हे त्यांनी सांगावे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले ते वक्तव्य असावे. अजित पवारांनी खुद के गिरेबान में छाक के देखना चाहिए। ते कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहेत? नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. खरेतर आरोप-प्रत्यारोप कसे करावे हे त्यांनी ठरविले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना अडचणीचे होईल, त्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे. तीन महत्त्वाच्या नेत्यांनी अशा तर्हेने फटकारल्यानंतर अजित पवार पुढील दहा दिवसांच्या प्रचारात भाजपाच्या विरोधात किती बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कुटुंबात एक गुंड
तर कुटुंब दोषी कसे?
अजित पवार म्हणाले की, कुटुंबातील एकाने गुन्हा केला तर त्याचे कुटुंब दोषी कसे? माझ्या मित्रपक्षांनी काहींना उमेदवारी दिली. ते म्हणाले की, त्यांचे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल तेव्हा त्यांना घड्याळ चिन्हावरच लढू दे. म्हणून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवत आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी नीट काम केले नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योजना आणल्या, पण त्याची अंमलबजावणी इथे करण्यात अपयश आले. मी फक्त पालकमंत्री होतो. आता मला सत्ता द्या तर मी विकास करून दाखवेन.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
वानरांचा आवाज काढणाऱ्यांना सरकारी नोकरी; दिल्ली विधानसभा परिसरातील माकडांवर नियंत्रणासाठी नवी योजना









