Ajit Pawar : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. बैठका, मुलाखती, चर्चा, जागावाटप या सगळ्या महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच भांबावून सोडले आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण सोबत न घेता अचानक एकटेच रवाना झाले. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे.
नेमक प्रकरण काय?
मागच्या काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठकांसाठी उपस्थित राहत आहेत. बारामती हॉस्टेमध्येच ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी सातत्त्याने घेत आहेत. मात्र, आज सकाळी अचानक ते इथून एकटेच बाहेर निघून गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षक यांचा ताफा ते घेऊन गेले नाहीत.
अधिकच्या माहितीनुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरल्याचे समोर येत होतं. मात्र, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढायची यावरून तिढा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. घड्याळ की तुतारी ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती देखील समोर आली आहे.
ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाशी चर्चा अपयशी ठरल्यानंतर अचानक अशाप्रकारे अजित पवार एकटेच गेल्याने विविध चर्चांना मात्र चांगलेच उधाण आले आहे. ते कौटुंबीक कारणासाठी तिथून बाहेर पडले की यामागे काही राजकीय कारण आहे? यावर तर्कवितर्क सुरू आहेत.
तर या सगळ्या प्रकारानंतर काही काळाने अजित पवारांचं वाहन त्यांच्या जिजाई निवासस्थानी आढळून आले. त्यांनी मागून त्यांचा ताफा देखील बोलावून घेतला. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच जिजाई याठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे देखील दाखल झाल्याची माहिती होती. त्यामुळे आता या चर्चा कोणते राजकीय वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिजाई निवासस्थानी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानातून बाहेर पडले. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा – Municipal Election 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजयाचा विश्वास! राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळतील; आमदार शंकर जगतापांचा मोठा दावा









