पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसणे टाळल्याने उपस्थितांना चर्चेला विषय मिळाला.
बारामती सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्रात (Agricultural Science Center of Baramati Science Center) टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या (Technology Demonstration Project) उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते, तर डॉ. अनिल काकोडकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी डॉ.अनिल काकोडकर यांना शरद पवार यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवले. त्यानंतर काका-पुतण्यामध्ये कोणताही थेट संवाद झाला नाही. या कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधले. याआधीही पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणे टाळले होते. त्यामुळे पवार कुटुंबातील पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.