Home / महाराष्ट्र / थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna

Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सोलापूर जिल्ह्यातील एक महिला आयपीएस अधिकारी यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अवैध उत्खननावर कारवाई करताना आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (Anjana Krishna) या थेट अजित पवारांशी भिडल्याचे पाहायला मिळाले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तर दुसरीकडे अजित पवारांवर टीकेची झोड उठली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाची तक्रार स्थानिक प्रशासनाला मिळाली. या तक्रारीनंतर महसूल अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी कारवाई सुरू केली असता, उत्खनन करणाऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन अधिकाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.

यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो फोन डीएसपी अंजना कृष्णा यांना दिला.

व्हिडिओमध्ये अजित पवार फोनवर, “मी DCM अजित पवार बोलतोय. ही कारवाई बंद करा… हा माझा आदेश आहे” असे बोलताना दिसतात. यावर, अंजना कृष्णा यांनी “तुम्ही माझ्या नंबरवर फोन करा, मी तुमच्या आदेशाची नोंद घेते” असे उत्तर दिले.

हे ऐकून अजित पवारांना राग अनावर झाला आणि त्यांनी, “तुझी इतकी डेअरिंग आहे का? माझा चेहरा तरी ओळखाल की नाही?” अशा शब्दांत त्यांना झापले.

यानंतर अजित पवारांनी त्यांना थेट व्हिडिओ कॉल केला, तेव्हा कुठे कारवाई थांबली. या घटनेनंतर आता काही ग्रामस्थ आणि फोन करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अंजना कृष्णा चर्चेत आल्या आहेत.

अंजना कृष्णा कोण आहेत?

12 डिसेंबर 1997 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरममधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंजना कृष्णा व्हीएस या एक धडाकेबाज आणि नैतिकतेने काम करणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात.

त्यांनी 2023 मध्ये UPSC परीक्षेत 355 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले होते. त्यांची पहिली नियुक्ती त्यांच्याच राज्यात, म्हणजेच केरळमधील त्रिवेंद्रममध्ये झाली. त्यानंतर 2024 मध्ये त्यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस दलात झाली आणि सध्या त्या करमाळा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल

किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई