Hindi-Marathi Language Controversy: महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेवरून निर्माण झालेला वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडत मराठी भाषेचा ठाम पुरस्कार केला. एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारताच ‘इथे आधी मराठी चालतं. मग हिंदी’, अशा शब्दात त्यांनी थेट सुनावले.
पत्रकार परिषदेत मराठीला प्राधान्य
पत्रकार परिषदेदरम्यान अजित पवार प्रश्नांची उत्तरे देत होते. त्यावेळी एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, “ही काय पद्धत आहे तुमची? पहिलं मराठी चालतं. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मराठी झाल्यावर मग हिंदी.”
भाषावादासंदर्भातील प्रश्नांवर अजित पवार म्हणाले, “प्रत्येकानेच आपापल्या राज्यातील मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे. भारतात हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते, इंग्रजी तिसरी भाषा म्हणून वापरली जाते. पण मातृभाषेचे महत्त्व यामध्ये कमी होत नाही. ती टिकवणं ही आपली जबाबदारी आहे.”
अजित पवारांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिक नागरिकांनाही काही मुद्दे लक्षात घेण्याचा सल्ला दिला. “जर एखाद्याला मराठी बोलता येत नसेल, तर त्यांनी नम्रपणे सांगावे की, आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तेवढं म्हटलं तरी आदर टिकतो. पण काही लोक ‘आम्ही मराठी बोलणारच नाही’ असे म्हणतात ते वाईट आहे,” असे त्यांनी सांगितले.
“आपण जिथे राहतो, तिथल्या लोकांचा सन्मान करणे गरजेचे आहे. भाषेच्या बाबतीतही थोडं संवेदनशील होणं गरजेचं आहे.”, असे ते म्हणाले.