Sunetra Pawar’s Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळत असतानाच राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार याबाबत राजकीय हालचाली सुरूही झाल्या आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येणार अशी चर्चा नगरपरिषद निवडणुकीपासून सुरू झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हे दोन्हीही गट एकत्र येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही या मिलनाबाबत कोणताही संदेश कधीही दिला नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गट एकत्र येण्याबाबतची चर्चा शरद पवारांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केली आणि त्या प्रकारची वक्तव्ये जाहीरपणे करण्यास सुरुवात केली. यामुळे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थता निर्माण होऊन घाईने उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे करण्यात आले आज दुपारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांना जाहीरपणे सांगितले की, उद्या विधिमंडळ नेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपद ( Sunetra Pawar’s Deputy Chief Minister ) स्वीकारण्यास होकार दिला आहे. उद्या दुपारी 2 वाजता पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता साधेपणाने शपथविधी सोहळा होईल. विलीनीकरणाबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, आता विधिमंडळ नेता निवडणे हे महत्त्वाचे आहे. कारण हा नेता उपमुख्यमंत्री होणार आहे. बाकी निर्णय नंतर घेतले जातील.
अजित पवार यांच्या जाहिरात व जनसंपर्क कार्याचे काम पाहणार्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सकारात्मक निरोप घेऊन अरोरा मुंबईत परतल्याचे कळते. अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.दुसरीकडे शरद पवार गटातील नेत्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे गेल्या काही दिवसांत अनेकवेळा सांगितले असले तरी राष्ट्रवादीच्या एकाही दिग्गज नेत्याने त्याला दुजोरा दिला नाही. किंबहुना शरद पवार यांचे नेतृत्व मान्य नसल्याचेच सूतोवाच केले. एवढेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनाही दूर ठेवण्याचीच मानसिकता असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटाचे दिग्गज नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख यांनी म्हटले की, दोन्ही गटांनी आता एकत्र आले पाहिजे. याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पवार कुटुंब घेतील. शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी जाहीरपणे सांगितले की, दोन्ही गट एकत्र यावेत ही अजित पवार यांची शेवटची इच्छा होती. यादृष्टीने अनेकदा बैठका झाल्या आणि चर्चा झाली. अजित पवार मला इतकेही म्हणाले की, विठ्ठल मणियार आणि श्रीनिवास पवार यांच्याशी तुझी अनेकदा भेट होते. तुम्ही तिघे मिळून शरद पवार यांचे मन वळवा. अंकुश काकडे यांच्याप्रमाणेच अनेकांनी सांगितले की, दोन्ही गट एकत्र येण्याचे निश्चित ठरले होते. शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी 12 डिसेंबरला याबाबत घोषणा होणार होती. मात्र तेव्हाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने ही घोषणा नंतर करण्याचे ठरले. या निवडणुका होताच ही घोषणा केली जाणार होती. शरद पवार गट सातत्याने याबाबत वक्तव्य करीत असले तरी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांनी आतापर्यंत याबाबत एकही वक्तव्य केलेले नाही. किंबहुना शरद पवार यांच्या गटासोबत जाण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेतृत्त्व पवार कुटुंबाकडे राहावे म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू करण्यात आली.
सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्षपद देऊन उपमुख्यमंत्री करायचे असे ठरविण्यात आल्याची चर्चा आहे. आज बारामतीत अजित पवार यांच्या अस्थि गोळा करून निरा नदीत त्यांचे विसर्जन होत असतानाच इकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान गाठले आणि त्यांच्याशी एक तास चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर बाहेर आल्यावर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. ते इतकेच म्हणाले की, सुनेत्रा पवार वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे. त्या कुुटुंबाचे म्हणणे, आमच्या आमदारांचे मत आणि जनतेच्या भावना या सर्व लक्षात घेऊन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सुनेत्रा वहिनी यांना आम्ही आज रात्री किंवा उद्या सकाळी भेटणार आहोत. सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. यानंतर ते पत्रकारांशी बोलणार असल्याने उत्सुकता वाढली होती. मात्र ते इतकेच म्हणाले की, अजित पवार नसताना या कार्यालयात येणे माझ्यासाठी अत्यंत दु:खद गोष्ट आहे. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी येथे आलो होतो. मला सध्या अधिक काहीही बोलायचे नाही. या दोघाही नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा करण्याबाबत एक वाक्यही उच्चारले नाही. यामुळे यापुढे दोन गट तसेच कायम राहणार की एकत्र येणार याबाबत काहीच अंदाज करणे अशक्य आहे.
अजित पवार यांच्याकडे वित्त, क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास ही खाती होती. राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याकडे आता ही खाती जाणार याबाबतही विचार सुरू आहे. शरद पवार गटाला सोबत घेतले तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून केंद्रात पाठवावे लागेल. जयंत पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात खाती द्यावी लागतील. येत्या एप्रिल महिन्यात शरद पवार यांची खासदारकीची मुदतही संपत आहे. त्यानंतर त्यांच्या मर्जीतील नेत्यांना खासदारकी द्यावी लागेल. हे सर्व करण्यास अजित पवार गटातील नेते राजी नाहीत. त्यामुळेच येत्या काळात सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार या तिघांपैकी एकाला पक्षाच्या केंद्रस्थानी आणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना दूर ठेवण्याची खेळी खेळली जाणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यावेत
अनिल देशमुख – अजित पवार यांची मनापासून इच्छा होती. त्यांनी पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे तो निर्णय पुढे गेला. अजित पवार यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांशी चर्चा करून ठरवले होते की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे आहे. त्यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. ते आज आपल्यात नाही. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन अजित दादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.
शशिकांत शिंदे – गेलेल्या माणसाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याग करण्याची भावना ठेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. 10-12 बैठका झाल्या होत्या. शेवटची बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झाली होती. जिल्हा परिषद – पंचायत समिती झाल्यानंतर अगोदरच विलीनीकरण करण्याबाबत चर्चा करून फायनल झाले होते. शरद पवार यांना विचारून निर्णय घ्यायचा अशी भूमिका निश्चित झाली होती.
—————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांचे पती श्रीनिवासन यांचे निधन












