Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : अजित पवारांना गेले काही महिने मोठ्या नेत्यांनी एकटे पाडले! पटेलांनी मुद्दाम फाईल उशिरा आणली? अरोरासाठी दबाव होता ! रोहित पवारांचे खळबळजनक आरोप! विलीनीकरणबाबतही पुरावे देणार

Rohit Pawar : अजित पवारांना गेले काही महिने मोठ्या नेत्यांनी एकटे पाडले! पटेलांनी मुद्दाम फाईल उशिरा आणली? अरोरासाठी दबाव होता ! रोहित पवारांचे खळबळजनक आरोप! विलीनीकरणबाबतही पुरावे देणार

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटाच्या मुद्यावरून अजित पवार आणि...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटाच्या मुद्यावरून अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. हे कंत्राट रद्द करायचे नाही, अरोराला पूर्ण पैसे द्यायचे असा त्यांच्यावर दबाव होता. गेले चार महिने देश व राज्य पातळीवरील नेत्यांनी दादांना एकटे पाडले होते. दादा रुग्णालयात असताना काय काय झाले ते सांगू शकतो, असा गंभीर आरोप करीत इशारे देत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार
( Rohit Pawar) यांनी सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन पर्दाफाश करणार असल्याचा इशाराच दिला.


त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विलीनीकरणाबाबत कोण काय बोलले, काय चर्चा झाली हे पुराव्यासह येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मांडणार, असेही रोहित पवार यांनी आज सांगितले.रोहित पवार दिल्लीत बोलत होते. ते  म्हणाले की, दादा जर 27 तारखेला गाडीने पुण्याला गेले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27  तारखेला ज्या-ज्या घटना घडल्या त्या मी बोलून दाखवल्या. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. मात्र 27 ते 28 तारखेपर्यंतच्या सर्व घडामोडींची सखोल चौकशी व्हावी. प्रमुख पायलट मागील एक-दोन महिन्यांत कुणाला भेटले, कुठे गेले याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी जे सांगितले, त्यावरून मी कुठेही खोटे बोललो नाही, हे स्पष्ट होते. 27 तारखेला तटकरे स्वतः म्हणतात की, ते उशिरापर्यंत तिथे होते. दुसरीकडे हिंदूराव सांगतात की, प्रफुल पटेल यांचा फोन आला आणि त्यामुळे दादांना उशीर झाला.

या दोन गोष्टी जर खर्‍या असतील, तर तिसरी गोष्टही तितकीच खरी असण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट ही की, त्या बैठकीत एका राजकीय सल्लागाराबाबत (नरेश अरोरा) चर्चा झाली. योगायोगाने त्या सल्लागाराने गेल्या काही महिन्यांत विमान खरेदी केले आहे. त्यांचा शेकडो कोटींचा करार रद्द करावा ही दादांची भूमिका होती. त्या मुद्यावरून वाद झाला. तटकरे तिथे उपस्थित होते. या वादामुळे उशीर झाला आणि त्यामुळे दादा गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यावेळी दादांचा चढलेला आवाज ऐकू येत होता असे मला सांगितले. त्यानंतर 28 तारखेला सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.


नरेश अरोरा यांना केवळ सर्व्हेपुरतेच ठेवावे, मी राजकीय सल्लागार घेऊन पक्ष चालवणार नाही, अशी दादांची भूमिका होती. या विषयावर दादांचा आवाजही चढलेला होता. यावर रोहित पवार म्हणाले की, ही  माहिती खरी आहे. कारण तीच माहिती मला देखील त्या सुत्रांमार्फत मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल, पुणे येथे रात्री साडेदहा-अकरा वाजेपर्यंत आम्ही दादांसोबत बसलो होतो. त्यावेळीही नरेश अरोराच्या कन्सल्टंटचे लोक तिथे आले होते आणि दादांनी त्यांना त्यांच्या शैलीत झापले होते. 27 तारखेलाही नरेश अरोराच्या वतीने त्यांचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवावे आणि त्यांना पैसे दिलेच पाहिजेत, अशी भूमिका काही  नेत्यांनी 27 जानेवारीच्या बैठकीत मांडली होती. मात्र याला अजितदादांचा ठाम विरोध होता.


राईस मिलची फाईल अचानक दादांच्या मंत्रालयाच्या कार्यालयात त्या दिवशी आली. दादांना या फाईलबाबत आधी काहीच माहिती नव्हती. संध्याकाळी प्रफुल पटेल यांचा फोन आल्यानंतर दादांनी फाईलबाबत माहिती घेतली. फाईल मंत्रालयात असल्याने  सही करण्यासाठी वेळ गेला. त्यामुळे संध्याकाळी उशिरा 7  वाजून 13 मिनिटांनी दुसर्‍या दिवसासाठी विमान बुक करावे लागले. गेल्या चार महिन्यांत दादा एकटे पडल्यासारखे आम्हा सर्वांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि पदाधिकारी दादांच्या बाजूने बोलत होते, पण देश आणि राज्य पातळीवरील मोठे पदाधिकारी दादांच्या बाजूने ना बोलत होते, ना प्रचारात त्यांच्या सोबत फिरत होते.
तुम्ही एनडीएसोबत जाणार होतात का? असा सवाल प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर रोहित पवार म्हणाले की, आज घेणार असलेली माझी प्रेस कॉन्फरन्स अत्यंत सखोल, तपशीलवार आणि पुराव्यांसह असणार होती. आता ही प्रेस कॉन्फरन्स सोमवार किंवा मंगळवारी मुंबईत होईल. त्यावेळी तुमचा आणि त्यांचा हा प्रश्न योग्य पद्धतीने उत्तरासह मांडला जाईल. कधी चर्चा झाली, कुठे झाली, काय ठरले, कोण काय बोलले या सर्व गोष्टी मी त्यावेळी पुराव्यासह सांगेन. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा नक्कीच होणार होती.


तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत आधी ऑडिओ-व्हिडिओ समोर येऊ द्या, मग बोलेन असे म्हटले होते. यावर रोहित पवार म्हणाले की,  ठीक आहे. मग त्यांना सांगा की सोमवार-मंगळवारपर्यंत थांबावे आणि आजच तारीख जाहीर करावी. दोन-तीन दिवसांनंतर नाही, थेट तारीख जाहीर करूया आणि मग पाहू काय होते.दादांचा अपघात झाल्यानंतर लगेचच विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. काही काळ थांबायला हवा होता, असा आरोप तटकरे यांनी केला. त्यावर रोहित पवार म्हणाले की, चर्चा कोणी सुरू केली, त्याचे नाव सार्वजनिकपणे घ्या. कधी, कशी आणि कुणी चर्चा केली, हे लोकांसमोर आणा. मोघम बोलून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे.

दादा हॉस्पिटलमध्ये असताना काय काय घडत होते, हेही आम्ही सांगू शकतो. मात्र या विषयाचे राजकारण करून एका मोठ्या नेत्याची बदनामी होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आम्ही शांत आहोत. कारण आम्ही दादांकडे पाहून शांत आहोत. शेवटच्या काळात काही सो कॉल्ड  नेत्यांनी दादांना किती एकटे  पाडले होते, हे आम्हाला माहिती आहे. पक्ष फुटल्यानंतर आम्ही कोणाची बाजू घेतली, या सगळ्यांची उत्तरे मी सोमवार किंवा मंगळवारी स्वतः देईन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. यावर रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय पवार तसेच काही वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान आणि अमित शहांची भेट घेतल्याचे माध्यमांकडूनच कळाले. दादांचा जो कुठला अपघात झाला आहे तो घातपात आहे का हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे. हाच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी मी आशा करतो. काकी आणि इतर सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून एकच मुद्दा मांडला असावा, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. 13 दिवस आम्ही दुःखात होतो. त्यामुळे पार्थ आणि जय सोबत ही चर्चा केलेली नाही.

—————————————————————————————————————————–

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या