Ajit Pawar Last Call: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अजूनही पचवणे राज्याला कठीण जात आहे. त्या भीषण विमान अपघाताच्या काही काळ आधी अजित दादा नेमके कोणाशी बोलले होते आणि त्यांचे अखेरचे शब्द काय होते, याचा खुलासा आता झाला आहे.
त्यांच्या शेवटच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग समोर आले असून, मृत्यूच्या दारात असतानाही हा नेता जनसेवा आणि सर्वसमावेशक राजकारणाचाच विचार करत होता, हे यातून स्पष्ट होत आहे.
विमान अपघातापूर्वीचा ‘तो’ संवाद
जिल्हा परिषद निवडणुकीच्या नियोजनासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे जात होते. लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र, अपघाताच्या काही मिनिटे आधी, सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना फोन केला होता.
श्रीजीत यांनी एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देण्याबाबत दादांना मेसेज केला होता, त्याचे समाधान करण्यासाठी दादांनी विमानातूनच त्यांना संपर्क साधला होता.
नेमकी काय झाली चर्चा?
श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे रेकॉर्डिंग सार्वजनिक केले आहे. या संवादात अजित पवार म्हणतात, “माहिती नसतं, काही नसतं.. उगीच काहीतरी करायचं. आम्ही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत बाळा…”
यावर श्रीजीत यांनी आपली बाजू मांडली असता दादांनी पुढे स्पष्ट केले की, “मान्य आहे, पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आधीच दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होतं. इतर पक्षांनी काय केले माहीत नाही, पण आपण आपले काम चोख केले आहे.”
कार्यकर्ते झाले भावूक
हे रेकॉर्डिंग ऐकवताना श्रीजीत पवार यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले की, “दादांना कोणीही मेसेज केला तरी ते आवर्जून उत्तर द्यायचे. विमान प्रवासात असतानाही त्यांनी माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी वेळ काढला. हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा होता, हे जगाला कळावे म्हणूनच मी हे रेकॉर्डिंग समोर आणले आहे.”
दरम्यान, अजित पवारांच्या या आकस्मिक जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करतानाच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अपघातात प्राण गमावलेल्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, या अपघाताचा सखोल तपास अजूनही सुरू असून, या शेवटच्या कॉलमुळे अजित पवारांच्या कार्यपद्धतीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.









