मुंबई – छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख विजयकुमार घाटगे यांना काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि इतरांनी केलेल्या मारहाणीचे आज राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटले. सूरज चव्हाण याच्या अटकेसाठी छावा संघटनेसोबत विविध शेतकरी संघटनांनी लातूर,धाराशिव, संभाजीनगर आणि नांदेडसह राज्यात ठिकठिकाणी उग्र निदर्शने केली.दरम्यान, राज्यभरात वाढता तणाव पाहताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पहिल्यांदा एक्स पोस्ट करून सूरज चव्हाण याच्या कृत्याचा निषेध केला. त्यानंतरही छावाची निदर्शने सुरूच राहिल्याने तासाभरात पुन्हा पोस्ट करून त्यांनी सूरज चव्हाणला पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मोबाईवर ऑनलाईन रमी हा पत्त्याचा खेळ खेळत असतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी काल समाज माध्यमांवर प्रसारित केला. या व्हिडिओमुळे छावा संघटनेसह तमाम शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. दुबार पेरणीच्या संकटासह शेतकरी अनंत संकटांशी सामना करत असताना कृषिमंत्री मोबाईलवर रमी कसे काय खेळू शकतात,असा सवाल करत काल छावा संघटनेचे विजय कुमार घाटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लातूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला. घाटगे यांनी तटकरेंना निवेदन देण्याआधी खिशातून पत्ते काढून ते तटकरेंसमोरील टेबलावर फेकले. त्यानंतर घाटगे यांनी तटकरेंना निवेदन दिले. ते तटकरेंनी शांतपणे स्वीकारले. त्यानंतर घाटगे आणि त्यांचे सहकारी तिथून निघून गेले. अर्ध्या तासानंतर सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अर्ध्या तासाने गाठले आणि घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारत त्यांना जबर मारहाण केली. घाटगे यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे .
या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. तटकरे यांचा आज धाराशिवचा दौरा होता. परंतु कालच्या मारहाणीमुळे निर्माण झालेला तणाव पाहून तटकरेंच्या पत्रकार परिषदेचे स्थळ चार वेळा बदलण्यात आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही छावा आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. तिथे लावण्यात आलेले पक्षाचे बॅनर फाडले. सूरज चव्हाण, अजित पवार यांच्या प्रतिमांना जोडे, चाबकांचे फटके मारण्यात आले. पाऊस पडला जोराचा, अजित पवार बाराचा, अजित पवार हाय हाय,अशा घोषणा देत निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला.
संभाजीनगरच्या क्रांतीचौकातही छावा संघटना आणि शेतकरी, सामाजिक संघटनांनी उग्र निदर्शने केली. सूरज चव्हाण हा पिसाळलेला कुत्रा आहे, त्याला जेरबंद करावे. जो कृषिमंत्री विधान परिषदेत पत्ते खेळतो त्याला पदावर राहण्याचा हक्क नाही. त्याचा तत्काळ राजीनामा घ्यावा,अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. क्रांतीचौकात लावलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या होर्ड़िंगवर चढून एका कार्यकर्त्याने तो बॅनर फाडला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाराशिवमध्ये सुनील तटकरे यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र छावाचे कार्यकर्ते आक्रमक राहिले. सूरज चव्हाणला दिसेल त्या ठिकाणी मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,असे त्यांनी सांगितले. दरम्यान , हिंगोली आणि नांदेडमध्येही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गांवर टायर जाळून सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निषेध केला. यापुढे अजित पवार गटाच्या एकाही आमदाराला महाराष्ट्रीत फिरू देणार नाही,असा इशार कार्यकर्त्यांनी दिला.
सूरज चव्हाणने
माफी मागितली
छावा संघटना आक्रमक झाल्याचे पाहताच आज सूरज चव्हाण याने माध्यमांसमोर येऊन झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्याने माझ्यासह कार्यकर्त्यांना राग अनावर झाला. त्यामुळे कालची अनुचित घटना घडली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.मी लवकरच घाटगेंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करेन,असे सूरज चव्हाण म्हणाला.
तटकरेंच्या सांगण्यावरून
आमच्यावर हल्ला झाला
सूरज चव्हाणच्या माफीनाम्यानंतर माध्यमांनी इस्पितळात उपचार घेत असलेले विजयकुमार घाटगे यांना विचारले असता सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर हल्ला झाला. हा हल्ला पूर्व नियोजित कटाचा भाग होता. सूरज चव्हाण यांनी त्यांचे काम केले. आता आम्ही आमचे काम करू ,असा इशारा घाटगे यांनी दिला.
Ajit Pawar orders Suraj Chavan to resign! Protests across the state