Home / महाराष्ट्र / Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर...

By: Team Navakal
Ajit Pawar Plane Crash
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेत अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (शिष्टाचार) नुसार, उद्या गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बारामती येथे अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून यादरम्यान सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कसा घडला हा भीषण अपघात?

दिल्लीतील ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या कंपनीचे ‘लिअरजेट ४५’ हे विमान आज सकाळी ८:१० वाजता मुंबईहून बारामतीकडे झेपावले होते. मात्र, सकाळी ८:४५ च्या सुमारास या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि काही क्षणांतच, म्हणजे ८:५० वाजता बारामती विमानतळाजवळ हे विमान कोसळले. विमानाचे लँडिंग होण्यापूर्वीच काळाने घाला घातला. या दुर्घटनेची तीव्रता इतकी भीषण होती की, अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटवावी लागली. या दुर्घटनेत पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी या पाचही जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीहून ‘एएआयबी’चे (AAIB) पथक बारामतीकडे रवाना झाले आहे.

अंत्यदर्शनाचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचा जनसागर

अजित पवार यांचे पार्थिव सुरुवातीला बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते, जिथे त्यांच्या समर्थकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात आणण्यात आले. आज रात्री १० वाजेपर्यंत या ठिकाणी सर्वसामान्यांना अंत्यदर्शन घेता येईल. उद्या सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात येईल. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघी बारामती आणि महाराष्ट्र लोटला आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल.

“संघर्षातला सोबती हरपला” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या दुःखद प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “हा काळ पवार कुटुंब आणि पक्ष या दोघांसाठीही अत्यंत कठीण आहे. आम्ही दोघांनीही राजकीय जीवनात संघर्षाचे अनेक दिवस एकत्र पाहिले आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकासातील एक गतीमान चाक थांबले आहे.” अजित पवार आज बारामतीमध्ये तीन महत्त्वाच्या जाहीर सभांना संबोधित करणार होते, परंतु त्यापूर्वीच नियतीने त्यांच्यावर आणि राज्यावर हा घाला घातला.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या