Ajit Pawar Plane Crash Black Box : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला २० दिवस उलटले तरी या प्रकरणातील गुढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या दुर्घटनेच्या तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक बॉक्स’बाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे. “विमानाचा ब्लॅक बॉक्स ऊन, वारा, पाऊस, आग आणि अगदी बॉम्बस्फोटापासूनही सुरक्षित राहू शकतो, परंतु तो दुर्दैवाने ‘राजकारणापासून’ सुरक्षित नाही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी रोहित पवार आज मुंबईत आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर तीव्र शंका उपस्थित केली. ब्लॅक बॉक्स तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित आणि कशाही परिस्थितीत टिकून राहणारा उपकरण असतानाही, त्यातील डेटा मिळवण्याबाबत जी दिरंगाई किंवा तांत्रिक बिघाडाच्या बातम्या येत आहेत, त्यावरून त्यांनी संशय व्यक्त केला.
अपघाताच्या पहिल्या दिवसापासून रोहित पवार या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विमान अपघात तपास ब्युरोने नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणानंतर, ज्यात ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाल्याचे म्हटले होते, रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) नेमका का आणि कसा खराब झाला, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या विषयावर तांत्रिक प्रकाश टाकला होता. ब्लॅक बॉक्स हा जरी अत्यंत सुरक्षित मानला जात असला, तरी कोणत्या टोकाच्या परिस्थितीत तो निकामी होऊ शकतो, याची माहिती त्यांनी ‘एक्स’वर दिली होती.
अमोल मिटकरी म्हणाले, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विशिष्ट मर्यादेपर्यंतच बाह्य संकटांपासून संरक्षण देऊ शकतो. त्यांच्या माहितीनुसार, जर अपघातानंतर लागलेल्या आगीची तीव्रता प्रचंड असेल आणि तापमान १,१०० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले, तर ब्लॅक बॉक्सच्या आतील संवेदनशील घटकांना धोका निर्माण होतो. विशेषतः जर ही भीषण आग ६० मिनिटांपेक्षा (एक तास) अधिक काळ धगधगत राहिली, तर त्यातील ‘फ्लॅश मेमरी’ (Flash Memory) उष्णतेमुळे कायमची खराब होऊ शकते. मेमरी चिपला पोहोचलेली ही इजा माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
तपास यंत्रणांच्या दाव्याला तांत्रिक दुजोरा?
विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) नुकतेच स्पष्ट केले होते की, अजित पवार यांच्या विमानात लागलेली आग बराच वेळ शमला नव्हती, ज्याचा परिणाम रेकॉर्डरवर झाला आहे. मिटकरी यांनी मांडलेले तांत्रिक निकष याच दाव्याला अधिक स्पष्ट करताना दिसतात.
मिटकरींच्या विधानांमधील ‘यू-टर्न’; ब्लॅक बॉक्सच्या स्थितीवरून संभ्रम वाढला-
या प्रकरणावर तांत्रिक भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या सतत बदलणाऱ्या विधानांमुळे आता त्यांच्याच भूमिकेत मोठा विरोधाभास निर्माण झाला असून, प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
पहिले विधान: आगीमुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता-
काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ब्लॅक बॉक्स नष्ट होण्याच्या तांत्रिक मर्यादा सांगितल्या होत्या. त्यांच्या मते, जर विमानाला ३,४०० जी.एस. (Gs) पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का बसला, किंवा १,१०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ६० मिनिटांहून अधिक काळ आग लागली, तर ब्लॅक बॉक्समधील ‘फ्लॅश मेमरी’ खराब होऊ शकते. तसेच, खोल समुद्रात खाऱ्या पाण्यामुळे गंज चढून डेटा जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. एक प्रकारे, ब्लॅक बॉक्स जळू शकतो या तपास यंत्रणांच्या दाव्याला त्यांनी तांत्रिक आधार दिला होता.
दुसरे विधान: विमानाची शेपटी सुरक्षित, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला?
मात्र, आज अमोल मिटकरी यांनी केलेल्या नव्या पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पूर्णपणे वेगळी आणि पहिल्या विधानाशी विसंगत भूमिका मांडली आहे. मिटकरी म्हणाले की, “विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सुरक्षिततेसाठी नेहमी विमानाने मागील भागात म्हणजेच ‘टेल’ (शेपटी) मध्ये बसवलेला असतो. अनेकदा अपघातात विमानाचा पुढचा भाग उद्ध्वस्त झाला तरी शेपटीचा भाग सुरक्षित राहतो. विशेष म्हणजे, ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत आहे आणि ती अजिबात जळालेली नाही.”
मिटकरी यांनी पुढे असेही नमूद केले की, जर विमानाचा मागील भाग सुरक्षित असेल, तर तिथे असलेला ब्लॅक बॉक्स जळण्याचा किंवा त्याला कोणतीही इजा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “अति-उच्च तापमानातही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता असलेला ब्लॅक बॉक्स नेमका कसा जळाला?” असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे.
मिटकरी यांच्या या दोन परस्परविरोधी विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आधी ब्लॅक बॉक्स खराब होण्याची तांत्रिक कारणे सांगणारे मिटकरी आता तो सुरक्षित असल्याचे सांगून तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. विमानाची शेपटी सुस्थितीत असतानाही ‘ब्लॅक बॉक्स जळाल्याचे’ सांगितले जाणे, हे प्रकरणातील संशय वाढवणारे आहे. मिटकरींच्या या बदलत्या भूमिकेमुळे हा अपघात होता की घातपात, आणि तपासात पारदर्शकता आहे का, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतुल लोंढे यांचे ‘ब्लॅक बॉक्स’बाबतचे गंभीर विधान-
या प्रकरणावर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक दावा केला होता. “संबंधित विमान कंपनीकडून (व्हीएसआर) विमानातील ब्लॅक बॉक्स जाणीवपूर्वक बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. जर उड्डाणादरम्यान ब्लॅक बॉक्सच बंद असेल, तर अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याची कोणतीही माहिती समोर येऊ शकणार नाही,” असे लोंढे यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाने प्रकरणातील तांत्रिक गुंतागुंत आणि संशयाचे वातावरण अधिकच गडद केले आहे.
“लोकांमध्ये खोटी कारणे पेरली जात आहेत” – रोहित पवार
अतुल लोंढे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानांची दखल घेत रोहित पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ब्लॅक बॉक्सबद्दल मुद्दामहून अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे की तो बंद होता. मुळात, तांत्रिकदृष्ट्या ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. खऱ्या गोष्टी जनतेसमोर येऊ नयेत, यासाठी आतापासूनच अशा प्रकारची खोटी कारणे लोकांच्या मनावर बिंबवली जात आहेत.”
अपघात की घातपात? तपासावरून निर्वाणीचा इशारा-
रोहित पवार पुढे म्हणले “जर भविष्यात तपास यंत्रणांनी ‘ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला तपास करता येत नाही’ असे कारण दिले, तर त्यावर शिक्कामोर्तब होईल की अजितदादांचा हा अपघात नव्हता, तर तो नियोजित ‘घात’ होता. प्रशासनाने अशा तांत्रिक पळवाटा शोधून सत्य दडपण्याचा प्रयत्न करू नये.” विमानाची सुरक्षितता आणि ब्लॅक बॉक्सची कार्यपद्धती पाहता, तो बंद असणे किंवा जळून खाक होणे या दोन्ही गोष्टी रोहित पवारांनी फेटाळून लावल्या आहेत.
त्यातच आता समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत ब्लॅक बॉक्समधील चिप आणि डेटा रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलण्यासाठी अत्यंत कळीचा मानला जाणारा ‘ब्लॅक बॉक्स’ (Flight Data Recorder) हा जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपास यंत्रणांसमोर मोठी तांत्रिक कोंडी निर्माण झाली आहे. आता या संकटावर मात करण्यासाठी आणि ब्लॅक बॉक्समधील माहिती सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तो परदेशातील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या नवीन विकासामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये शंकेची पाल चुकचुकू लागली असून, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेला संशय अधिक गडद होताना दिसत आहे.
रोहित पवारांच्या आरोपांना बळ?
आमदार रोहित पवार यांनी सातत्याने हा अपघात संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. “ब्लॅक बॉक्स जळाला आहे आणि आता तो परदेशात पाठवावा लागेल,” असे सांगणे ही केवळ तपासाला विलंब करण्याची आणि मुख्य पुराव्यांशी छेडछाड करण्याची पळवाट तर नाही ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
रोहित पवारांची उद्या पत्रकार परिषद; चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची पत्रकार परिषद-
या संपूर्ण प्रकरणातील संशयास्पद बाबी आणि तपासाच्या संथ गतीवर सविस्तर भाष्य करण्यासाठी त्यांनी उद्या, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विशेष पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
तपासातील विसंगतींवर करणार भाष्य-
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास ज्या गतीने व्हायला हवा होता, तो अद्याप झालेला नाही, असा आरोप रोहित पवार सातत्याने करत आहेत. विशेषतः, अत्यंत सुरक्षित मानला जाणारा ब्लॅक बॉक्स जळाल्याचे वृत्त समोर आल्याने आणि आता तो परदेशात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने त्यांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?
विमान क्षेत्रात ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) या उपकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा एखादी विमान दुर्घटना घडते, तेव्हा त्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष या एका उपकरणाकडे लागलेले असते. नावावरून हा डबा काळ्या रंगाचा असेल असा सर्वसामान्यांचा समज असतो, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. हा बॉक्स अत्यंत भडक केशरी (International Orange) रंगाचा असतो, जेणेकरून विमानाचा अपघात झाल्यानंतर ढिगाऱ्यात किंवा समुद्राच्या तळाशी तो शोधणे सहज सोपे व्हावे.
ब्लॅक बॉक्सची रचना आणि टिकाऊपणा
हे उपकरण केवळ एक रेकॉर्डिंग यंत्र नसून ते विज्ञानाचा एक चमत्कार आहे. विमान जळून खाक झाले किंवा समुद्रात कोसळले, तरीही हा बॉक्स शाबूत राहील अशा पद्धतीने याची निर्मिती केलेली असते. हे उपकरण टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलच्या अत्यंत कठीण थरांनी बनलेले असते, जे प्रचंड उष्णता, पाण्याचा दाब आणि भीषण आघात सहन करण्यास सक्षम असते.









