Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : “तुमच्या तोंडात साखर पडो!” बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहून अजित पवारांचे सूचक विधान; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Ajit Pawar : “तुमच्या तोंडात साखर पडो!” बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहून अजित पवारांचे सूचक विधान; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Ajit Pawar on Sharad Pawar Photo Banner : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणांनी अचानक नवे वळण घेतले...

By: Team Navakal
Ajit Pawar on Sharad Pawar Photo Banner :
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar on Sharad Pawar Photo Banner : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणांनी अचानक नवे वळण घेतले आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता युती आणि आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजपला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

या नव्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांमधील कटुता संपून ते पुन्हा कायमचे एकत्र येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

“तुमच्या तोंडात साखर पडो!”

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो दिसून आल्याने सर्वांच्या नजरा खिळल्या. पत्रकारांनी जेव्हा विचारले की, “हा फोटो बॅनरवर कायमस्वरूपी दिसणार का?”, तेव्हा अजित पवारांनी हसत उत्तर दिले, “तुझ्या तोंडात साखर पडो.”

अजित पवारांच्या या एका वाक्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, भविष्यात दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे.

भाजपच्या आव्हानामुळे नवी समीकरणे

राज्यात आणि केंद्रात अजित पवार महायुतीसोबत असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने अजित पवार गटाविरुद्ध शड्डू ठोकल्याने ही नवी आघाडी आकारास आली आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सावध भूमिका घेत म्हटले की, “ही स्थानिक पातळीवरील आघाडी आहे, याचा सध्या वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. मात्र, भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही.”

पिंपरी-चिंचवडशी असलेले जुने नाते

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शहराच्या विकासाचा आढावा घेतला. 1991 मध्ये शहराने आपल्याला खासदार केल्यापासून शहराशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती, याचा उल्लेख करत त्यांनी मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपवर निशाणा साधला. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या