Ajit Pawar : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रचारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही,” असे विधान फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले होते.
या टीकेला आता अजित पवार यांनी पुण्यातून जोरदार प्रत्युत्तर दिले असून, महायुतीतील मित्रपक्षांमधील वाद अधिक तीव्र झाला आहे.
फडणवीसांची नाराजी नक्की कशावर?
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर आणि गेल्या ९ वर्षांतील कारभारावर सडकून टीका केली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी युतीचा धर्म पाळत पहिल्या दिवसापासून मित्रपक्षांवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका न करण्याचे ठरवले होते. मात्र, अजित पवारांनी जी वक्तव्ये केली ती मला पटलेली नाहीत. त्यांनी युती धर्माचे पालन केले नाही.” तसेच, काही लोकांना ९ वर्षांनंतर अचानक कंठ फुटला, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
अजित पवारांचा सडेतोड पलटवार
मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “मी कुठे वैयक्तिक टीका केली आहे? मी जर या ठिकाणी महापालिका निवडणूक लढवत असेल, तर गेल्या ९ वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून काय चुका झाल्या, हे सांगायचे नाही का? चुका पुराव्यानिशी दाखवणे म्हणजे युती धर्म न पाळणे असे होते का?”
‘९ वर्षांनी कंठ फुटला’ या विधानावर बोलताना अजित पवार यांनी उपहासाने म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत निवडणुकाच जाहीर झाल्या नव्हत्या, मग लोक बोलणार कसे? आता निवडणूक आली आहे, म्हणून आम्ही प्रश्न मांडत आहोत.”
महेश लांडगे विरुद्ध अजित पवार संघर्ष
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका करत त्यांचे जुने ‘करेक्ट कार्यक्रम’चे विधान आठवून दिले होते. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, “तो (महेश लांडगे) खूप मोठा आणि स्वयंभू नेता आहे, त्याचा बोलवता धनी कोणी नाही.”
निवडणुकीच्या या काळात महायुतीचे दोन बडे नेते समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.









