Ajit Pawar on Corruption Allegations : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या जुन्या आरोपांचा संदर्भ देत भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी केली.
आरोपांवरून भाजपला प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांच्यावरील गुन्हेगारी आरोपांबाबत विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले, “सिद्धार्थवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप आहे, पण तो अद्याप सिद्ध झालेला नाही. गुन्हा दाखल झाला म्हणजे माणूस गुन्हेगार ठरत नाही. माझ्यावरही जलसंपदा विभागात ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते, पण ते सिद्ध झाले का? उलट, ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले, त्यांच्यासोबतच आज मी सत्तेत सहभागी आहे.” या विधानाने त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. “आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा गौरव असलेल्या या संस्थेला भाजपने कर्जबाजारी केले आहे. २०१७ पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना आम्ही कधीही कर्ज काढले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात ८००० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्यात आल्या. हा पैसा नेमका कुठे खर्च झाला, हे सत्ताधाऱ्यांनी जनतेला दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
शहरातील विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा अजित पवारांनी केला. “सव्वा किलोमीटरच्या रस्त्यासाठी ८१ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. श्वान नसबंदी प्रकल्पातही भ्रष्टाचार झाला असून २० हजार लोकांना कुत्रे चावले आहेत, मग नसबंदी केलेले कुत्रे गेले कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निविदांची रक्कम फुगवणे आणि अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था करणे, असे प्रकार शहरात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुंडगिरी आणि दादागिरीवर टीका
निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घ्यायला लावल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप पवारांनी केला. “काही उमेदवारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना धमकावण्यात आले. लोकशाहीत अशी दादागिरी सहन केली जाणार नाही. मी फक्त आरोप करत नसून भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार आहे,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील जनतेला ‘घड्याळ-तुतारी’ युतीला साथ देण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा – Ajit Pawar : “तुमच्या तोंडात साखर पडो!” बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहून अजित पवारांचे सूचक विधान; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र











