Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सर्वाधिक चर्चा होत आहे. दोन्ही गट विलीन व्हावे ही अजित पवारांची अखेरची इच्छा होती, असे शरद पवार गटाचे सर्व ज्येष्ठ नेते सांगत आहेत. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी अशा चर्चेचा साफ इन्कार करीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन आपला मार्ग वेगळा असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केले. मात्र अजित पवार यांनी 22 डिसेंबर, 17 जानेवारी अशा अनेक दिवशी विलीनीकरणाबाबत बैठका घेतल्या याचे पुरावे उघड होऊ लागले आहेत. यामुळेच आता चर्चा सुरू आहे की, अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर विलीनीकरणाची घोषणा करून भाजपा आणि शिंदे गटापासून दूर जाणार होते. त्याचीच ही तयारी सुरू होती. हा मोठा निर्णय असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून त्यांच्याच गटाच्या अनेक नेत्यांना याबाबत अंधारात ठेवले होते. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे 13 दिवस संपल्यानंतर म्हणजेच सोमवारी विलीनीकरणाबाबत राजकीय वक्तव्य करणार असून, पुरावेही सादर करणार आहेत. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी 17 जानेवारी रोजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आदींशी चर्चा करताना दिसत आहेत. ही विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती, असा दावा करण्यात आला. जयंत पाटील यांनीही आपल्या घरी विलीनीकरणाबाबत अनेक बैठका झाल्याचे सातत्याने म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी तर अजित पवार यांची शपथ घेऊन विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असे सांगितले आहे. त्यातच आज शरद पवार यांनी अनौपचारिकपणे बोलताना फडणवीस यांना टोला लगावत म्हटले की, जे बैठकीला उपस्थितच नव्हते ते बैठकीत काय चर्चा झाली हे कसे सांगणार आहेत? तूर्त विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त कुणीही बोलू नये अशा सूचना शरद पवारांनी दिल्याचे कळते. यामुळेच आता 9 फेब्रुवारी रोजी अपेक्षित असलेल्या रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीत 22 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 12 असे तीन तास बैठक झाली होती आणि 23 डिसेंबरला जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाली होती अशी खात्रीलायक माहिती आज समोर आली. या बैठकीत विलीनीकरण झाल्यास ज्या नेत्यांचे नुकसान होईल असे वाटते अशा सर्व नेत्यांना बोलावून अजित पवार यांनी एकेकाशी एकांतात स्वतंत्रपणे चर्चा केली होती, असे ठरले होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी वारंवार असे छातीठोकपणे सांगितले आहे की, अजित पवारांनी त्यांना सांगितले होते की त्यांचे (अजित पवार) यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर याबाबत काय तो निर्णय घ्या, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते. गेले चार-पाच दिवस विलीनीकरणाची गरज फक्त शरद पवार गटालाच आहे, असे जे चित्र माध्यमांमध्ये रंगवले जात आहे ते साफ चुकीचे आहे. विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांचीसुध्दा इच्छा होती, असा दावा शिंदे यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची सहानुभूती संपली
सहाव्या दिवशीच कराडचा दौरा! अध्यक्षपदाची घाई सुरू
कराड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाच महाराष्ट्राची जनता नाराज झाली होती. सत्तेसाठी काहीही सुरू आहे, अशी चर्चा जनसामान्यांत सुरू झाली. त्यानंतर आज सहाव्या दिवशी सुनेत्रा पवार या बारामती बाहेर पडून कराड आणि फलटणला गेल्या. यामुळे सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जी थोडी सहानुभूती होती तीही संपली अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पुढील 10 दिवस बारामतीतच थांबणार आहेत असे सांगितले गेले. तरीही उपमुख्यमंत्रिपदाला कोणताही कायदेशीर आधार नसताना इतक्या घाईने हे पद स्वीकारण्याची काय गरज होती? असा सवाल केला जात होता. त्यातच आज सहाव्या दिवशी सुनेत्रा पवार या बारामतीहून कराडला दाखल झाल्या. त्यांनी प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा वेळोवेळी यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करत असत. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खा. सुनील तटकरे, खा. नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना झाल्या. अजित पवार यांचे विश्वासातील बॉडीगार्ड स्वर्गीय विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विदीप जाधव यांच्या पत्नीला त्यांनी आश्वासन दिले की, कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे. विदीप जाधव यांच्या पत्नीने यावेळी सांगितले की, त्यांना मुलांना शिकवून मोठे करायचे होते व लवकरच आम्ही नवीन घरातही राहायला जाणार होतो. बारामतीवरून आलो की मी गावी येतो असे मला 27 जानेवारीला संध्याकाळी फोन करून सांगितले होते आणि दुसर्या दिवशी ही घटना घडली. विदीप यांच्या वडिलांनी 26 जानेवारी रोजी मुलाशी झालेली भेट ही शेवटची ठरली असे
खिन्नपणे म्हटले.
हा दौरा आटोपून सुनेत्रा पवार या बारामतीला परतल्या. हे सर्व घडत असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याच्या हालचालीही वेगाने सुरू झाल्या. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आल्यानंतर त्यांना तीव्र विरोध झाल्याने त्यांनी ताबडतोबच माझे नाव चर्चेत नव्हते असे म्हणत माघार घेतली. हे घडल्यानंतर आज दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटाच्या प्रमुखांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड व्हावी अशी ठाम मागणी केली. या पत्रांवर सांस्कृतिक कला विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत तरंगे, युवती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष वसीम भूरम यांच्या सह्या आहेत. या हालचाली सुरू झाल्याने येत्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड होईल अशी स्पष्ट चिन्ह
दिसत आहेत.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
पुणे पोर्श अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन..











