Ajit Pawar’s Party – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेच्या अर्ध्या जागेवर उभे आहे. धर्मादाय आयुक्तांनी संस्थेला त्यांची जागा भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र संस्थेच्या विश्वस्तांनी ती जागा विकली. या व्यवहारात असलेले साहिल प्रधान आणि जागा विकसित करणारी कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंध असून हा आणखी एक जमीन घोटाळा असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शिवाजीनगरमध्ये ज्या इमारतीमध्ये पत्रकार परिषद झाली त्या इमारतीसंदर्भात विजय कुंभार आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवाजीनगर येथील डेक्कन शुगर टेक्नालॉजी ही संस्था 1936 साली उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी स्थापन केली होती. या संस्थेची ही जागा मिळवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले.
संस्थेच्या विश्वस्तांकडून कल्पवृक्ष या कंपनीला समोरच्या बाजूला असलेल्या तीस हजार स्क्वेअर मीटरपैकी पंधरा हजार स्क्वेअर मीटर जागा साठ वर्षांच्या भाडेकराराने धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने सुरुवातीला देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र संस्थेने ती जागा कल्पवृक्ष कंपनीला विकली. पार्थ पवार यांची अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात करार होऊन अमेडीया कंपनीला तेजवानीकडून पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्या व्यवहारामध्ये साहिल प्रधान हा साक्षीदार आहे. त्याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीकडून कल्पवृक्ष या कंपनीबरोबर व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली. कल्पवृक्ष कंपनीतील संचालक हे अशा कंपन्यांचे देखील संचालक होते ज्यावर सुनेत्रा पवार संचालक होत्या. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील सहभाग दिसून येतो.कल्पवृक्ष कंपनीने तिथे 13 मजली इमारत उभारली. 63 हजार स्क्वेअर फूट कमर्शियल जागा त्याठिकाणी निर्माण झाली.बांधकामासाठी चार एफएसआय मिळाला. त्यापैकी खालच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे तर वरचे मजले कमर्शियल रेटने विकण्यात आले, असा आरोप कुंभार यांनी केला आहे.
साखर उद्योगातील नवे तंत्रज्ञान आणि संशोधनात भारत स्वावलंबी होण्यासाठी उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पुण्यातील शिवाजी नगर भागात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची स्थापना केली. तेथील तीस हजार स्क्वेअर फूट जागा या संस्थेच्या मालकीची झाली. त्यापैकी पुढच्या बाजूला असलेल्या जागेवर संस्थेची इमारत उभी राहिली तर पाठीमागची तेवढीच जागा मोकळी ठेवण्यात आली. या संस्थेकडून पाठीमागच्या मोकळ्या जागेत 2011 मध्ये एक इमारत बांधण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
साखर उद्योगात शास्त्रीय आणि तांत्रिक ज्ञान वाढीस लागावे हा संस्थेचा मूलभूत उद्देश आहे. संस्थेचे 2200 सदस्य आहेत. संस्थेतून चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, 35 डॉक्टर आणि 1400 पेक्षा अधिक पदवीधारक तयार झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये संस्थेच्या शाखा आहेत. संस्थेला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही तर सदस्यांकडून होणारी मदत, जाहिरात आणि इतर मार्गाने संस्थेला अर्थपुरवठा होतो. सध्या एस.बी.भाड हे संस्थेचे अध्यक्ष आहेत तर रोहन शिरगावकर हे उपाध्यक्ष आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
टाटा मेमोरियलमध्ये बॉम्ब धमकी!बॉम्ब धमकीमुळे मुंबई पोलिस सतर्क
सुरक्षेचे कारण देत बांगलादेशच्या संघाचा भारतात येण्यास नकार; ICC कडे केली ‘ही’ मोठी मागणी









