Alliance broken in Pune – पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तुतारीऐवजी घड्याळ चिन्ह घेऊनच निवडणूक लढवायची असा हट्ट अजित पवार यांनी केला. त्यांची ही मागणी शरद पवारांनी साफ फेटाळली. त्यामुळे गेले आठवडाभर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुरू असलेली चर्चा साफ फिसकटली. आता शरद पवार मविआसोबत आणि अजित पवार शिंदेंसोबत जातील, असे चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र अजित पवार यांनी घड्याळ चिन्हाचा हट्ट धरला नाही. यामुळे तिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि आपापल्या चिन्हावर लढतील.
शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितले की, अजित पवार यांच्याशी आमच्या नेत्यांची भेट झाली. आम्ही त्यांच्या चिन्हावर लढू शकत नाही हे आम्ही सांगितले. त्यानंतर बैठकीत युतीबाबत पुढे कोणतीही चर्चा झाली नाही. इतर गप्पा झाल्या आणि आम्ही परतलो. आमची महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत सुप्रिया सुळे माहिती देतील.
आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक एकटेच रवाना झाले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठकांसाठी मुक्कामी होते. पुण्यातील युतीची चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले व आपल्या फॉर्च्युनर गाडीने थेट ‘जिजाई’ या निवासस्थानी दाखल झाले. त्याचवेळी तिथे शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हेही दाखल झाले.
या दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ही माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण नेमके अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानातून बाहेर पडताना प्रसार माध्यमांच्या दृष्टीस पडले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्र लढण्यासाठी ही बैठक होती. त्याआधी दोन दिवसांपूर्वी रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली होती व त्यानंतर पुढचा प्रस्ताव घेऊन अमोल कोल्हे हे अजित पवारांच्या भेटीला आले होते.
आज सकाळीच झालेल्या बैठकीत दोघांनी पिंपरी- चिंचवडला आपापल्या निवडणूक चिन्हावर लढायचे असे ठरले. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला ज्या आणखी 2 जागा हव्या होत्या त्या देण्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कबूल केले. मात्र दोन पक्षांमध्ये कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान पुण्यात अजित पवार यांच्याशी चर्चा फसल्यावर शरद पवार यांच्या पक्षाने महाविकास आघाडीशी चर्चेला सुरुवात केली आणि त्यांच्यात जागावाटपाचे सूत्रही निश्चित झाले. इतर पक्षांना 15 जागा सोडून मविआच्या प्रमुख पक्षांनी प्रत्येकी 50 जागा लढविण्याचे ठरवले. मात्र प्रभागाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार व उदय सामंत यांच्यात याबाबत एक बैठकही झाली. भाजपाकडून कार्यकर्त्यांचा अपमान नको, आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी वरिष्ठांना कार्यकर्त्याच्या भावना सांगितल्याची माहिती शिंदे सेनेचे रवींद्र धंगेकर
यांनी दिली.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलाचा लक्झरी कारमधून अर्ज दाखल
उन्नावप्रकरणी जामिनाविरोधात अखेर सीबीआयची सुप्रीम कोर्टात याचिका









