Alphonso Mango Price Hike: यंदा आंब्यांच्या राजाचा आस्वाद घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसेल, अशी चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील हापूस आंब्याच्या उत्पादनाला निसर्गाचा मोठा फटका बसला असून, यंदा बाजारपेठेत हापूसची आवक अत्यंत कमी राहणार आहे.
हवामानातील बदल आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन दशकांतील सर्वात कठीण हंगाम यंदा शेतकरी अनुभवत आहेत.
उत्पादनात मोठी घट आणि निसर्गाचा लहरीपणा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये यंदा हापूसचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरपर्यंत लांबलेला पाऊस आणि जमिनीतील ओलावा यामुळे सुरुवातीला मोहोर चांगला आला होता. मात्र, त्यानंतर तापमानात झालेली अचानक वाढ आणि आर्द्रतेमुळे मोहोराचे फळात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला. थ्रिप्स आणि तुडतुड्यांसारख्या कीटकांच्या हल्ल्यामुळे कोवळी फळे गळून पडली, ज्यामुळे बागायतदारांच्या हाती केवळ ३० ते ४० टक्केच पीक आले आहे.
पुणे मार्केट यार्डात आवक घटली
बाजारातील परिस्थिती पाहता हापूसची टंचाई स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या वर्षी १० ते १५ मार्च दरम्यान पुणे मार्केट यार्डात दररोज २,००० ते ३,००० पेट्यांची आवक होत होती. यावर्षी हा आकडा अवघ्या १५० ते २०० पेट्यांवर येऊन ठेपला आहे.
गुढीपाडव्याला किंमत ४,००० रुपयांवर?
१९ मार्च रोजी साजरा होणाऱ्या गुढीपाडव्यासाठी आंब्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. मात्र, पुरवठा कमी असल्याने किमतीत मोठी वाढ निश्चित मानली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा दर्जेदार हापूसचा दर २,५०० ते ४,००० रुपये डझनपर्यंत जाऊ शकतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर दुपटीहून अधिक आहे.
बागायतदारांना मजुरी, कीटकनाशके आणि देखभालीचा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी बागा राखण्यासाठी नेपाळी मजूर ठेवणेही बंद केले आहे. एकूणच, यंदाचा पाडवा गोड करण्यासाठी आंबा प्रेमींना आपली खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.
हे देखील वाचा – Fuel Crisis : इराण-अमेरिका युद्धामुळे आशियात इंधन टंचाई! ‘या’ देशात आता दर बुधवारी सरकारी सुट्टी जाहीर










