Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित कंपनी ‘डिझाईन बॉक्स’चे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावर एक्स पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.अजितदादांच्या निधनानंतर हा डिझाईन बॉक्सवाला गडी कुठे गायब झाला, असा सवाल करत मिटकरींनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी अरोरा यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
अजित पवारांच्या निधनानंतर चर्चेतील मुख्य परंतु लक्ष नसलेले पात्र, अशा शब्दात अरोरा यांचा उल्लेख मिटकरींनी केला.अजित पवार यांनी लढवलेल्या निवडणुका आणि त्यातील अरोरा यांच्या कामाचे मिटकरींनी अक्षरशः वाभाडे काढले. दहा-बारा फोटोग्राफर लावणे आणि अजित पवार यांना गुलाबी जॅकेट घालायला लावणे यापलीकडे निवडणुकांमध्ये अरोरांचे कोणतेही ठोस योगदान नव्हते, असा दावा मिटकरींनी केला. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या विमानाला अपघात की घातपात या चर्चेतील मुख्य व लक्ष नसलेले एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्सवाला गडी नरेश अरोरा. आता पुढील काळ निवडणुका नसल्याने अरोराचे पक्षातील काम संपले असले तरी काही गोष्टी अजित पवार यांच्यावर जीव ओवाळून टाकणार्या जनतेला माहीत असाव्यात म्हणून हा शब्दप्रपंच. राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्वेक्षण करून अरोरा यांनी अजित पवारांना दिले. मात्र अजित पवार यांनी त्यांचा सल्ला मानला नाही. त्यांनी त्यांनाच उमेदवारी दिली, ज्यांच्या विजयाबद्दल त्यांना विश्वास होता. ते उमेदवार 50 हजारहून अधिक मताधिक्क्याने निवडून आले.
डिझाईन बॉक्सच्या सर्वेक्षणाला न जुमानता अजित पवार यांनी स्वतःच्या यंत्रणेमार्फत आढावा घेऊन तिकीटे दिली. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे. विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाचे संपूर्ण श्रेय अजित पवार यांनाच जाते. यामागे दुसर्या कोणाचेही काडीमात्र योगदान नव्हते. अजित पवार यांना निवडणुका जिंकण्यासाठी अवाजवी घोषणा करण्याचा सल्ला नरेश अरोरा देत होते.मात्र अजित पवार यांनी त्यांना वेळोवेळी स्पष्ट शब्दात नकार दिला.मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार,असे अजित पवार यांनी अरोरा यांना बजावून सांगितले होते.आपल्या बोलण्याप्रमाणे वागत अजित पवार यांनी कधीही अवाजवी घोषणा दिल्या नाहीत. शरद पवारांवर टीका करा, अशा सूचनाही अरोरा द्यायचे. मात्र अजित पवार यांनी ते कधीच मानले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याचे ऐकिवात आहे.
पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, त्यांना ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदाराविषयी चुकीची माहिती अरोरा अजित पवारांना देत असत. सुरुवातीला ते पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत असावेत असे अजित पवारांना वाटले. त्यामुळे अरोरांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी काही आमदारांना झापले. पण नंतर त्या आमदाराने अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्याच्याविषयी त्यांचा अहवाल चांगला येऊ लागला. निवडणुकीत अजित पवार जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असताना या अरोरांनी त्यांना कमी जागा लढवण्याचा, सेना-भाजपासमोर उमेदवार न देण्याचा सल्ला दिला. तसेच अजित पवार यांच्या काही सभा त्यांच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आल्या. अरोरांची चलाखी अजित पवार यांनी ओळखली होती. पण ऐन निवडणुकीत नवीन प्रचार यंत्रणा उभी करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी अरोरांकडे दुर्लक्ष केले.पत्रके वाटणे, बॅनर लावणे आणि वातावरण निर्मिती करण्याच्या नावाखाली अरोराने पक्षाकडून आर्थिक लाभ घेतले. मात्र प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही, असे मिटकरी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.











