Anandraj Ambedkar on Prakash Ambedkar : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता आंबेडकर बंधूही (प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर) एकत्र येणार का, या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.
यावर आनंदराज आंबेडकर यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले असून, आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी भविष्यात एकत्र येण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. ‘प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, जसे ते दोन भाऊ एकत्र आलेत, तसेच भविष्यात आम्हीही एकत्र येऊ शकतो,’ असे संकेत त्यांनी दिले आहेत.
आंबेडकरी चळवळीच्या ऐक्यासाठी सकारात्मक प्रतिसाद
आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, ते आणि प्रकाश आंबेडकर दोघेही आंबेडकरी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी दोघांमध्ये काही तात्विक मतभेद असले, तरी चळवळ मोठी करण्यासाठी आणि आपली माणसे सत्तेत बसवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. जर यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न झाले, तर माझ्याकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आंबेडकरी चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युतीमधील जागावाटपावरून नाराजी आणि टीका
सध्या आनंदराज आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युतीत आहेत. मात्र, महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या जागांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिंदेंकडे काही महत्त्वाच्या जागांची मागणी केली होती, परंतु त्या मिळाल्या नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. युतीचा धर्म पाळत आम्ही काम करू, असे ते म्हणाले असले तरी, ‘आम्ही म्हणू तेच’ या मोठ्या पक्षांच्या भूमिकेवर त्यांनी प्रहार केला. आयत्या वेळी कोणी कोणाला मदत केली किंवा कोणी युती तोडली, याचा मोठा परिणाम निकालांवर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय टोलेबाजी आणि इतर नेत्यांवर प्रहार
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, त्यांच्या एकत्र येण्याचा परिणाम केवळ अंधभक्तांवर होईल, सर्व मराठी माणसांवर नाही. तसेच, सत्तेत बसून केवळ चळवळीच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी लक्ष केले. रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला की, केवळ सत्तेत राहून या गोष्टी साध्य होणार नाहीत. निवडणुकीत धर्माच्या आणि जातीच्या नावावर नागरिकांची विभागणी करून मूळ प्रश्न सुटणार नाहीत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे देखील वाचा – BMC Election 2026 : मुंबई कुणाची? वाचा बीएमसी निवडणुकीचा 50 वर्षांचा रंजक इतिहास









