Anger in BJP – भाजपाने इतर पक्षातील जो नेता गळाला लागेल त्याला पक्षात घेऊन तिकीट देण्याचा सपाटा लावल्याने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे मूळ कार्यकर्ते व नेते अत्यंत नाराज (Anger in BJP) आहेत, संतप्तही आहेत. या परिस्थितीचा भाजपाला कधी न कधी मोठा फटका बसणार आहे. नाशिकमध्ये मनसे व उबाठाची युती झाली म्हणून काल पेढे वाटणारे विनायक पांडे, यतिन वाघ हे उबाठाचे नेते आणि शाहु खैरे यांना आज भाजपात प्रवेश देऊन तिकिटाचे आश्वासन दिल्याने भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे प्रचंड नाराज झाल्या. त्यांची नाराजी इतक्या टिपेला पोहोचली की, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रवेशाला जाहीर विरोध केला. बाहेरून आलेल्या या लोकांना तिकीट दिले तर आम्ही तिकिटाची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे. असे म्हणताना त्यांना गहिवरून आले.
चंद्रपुरातही हाच प्रकार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना अंतर्गत विरोध करणारे भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपाने किशोर जोरगेवार यांना पक्षात घेतले. निवडणुकीची सूत्रे जोरगेवार यांच्या हाती दिली. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत याचा परिणाम होऊन भाजपाने आपटी खाल्ली. यावर मुनगंटीवार यांनी पक्षाला जाहीरपणे जबाबदार धरले. त्यानंतर पालिका निवडणूक प्रमुख पदावरून जोरगेवार यांना हटविण्याचा निर्णय आज सकाळी घेण्यात आला. पण त्यानंतर काही तासांतच हा निर्णय बदलून पुन्हा जोरगेवार हेच निवडणूक प्रमुख असतील असे रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले. भाजपाच्या इनकमिंगमुळे नव्याने पक्षात आलेल्यांनाच सत्ता, मंत्रिपद, सन्मान मिळत असल्याने मूळ कार्यकर्त्यांत नाराजी वाढत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात उबाठाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आ. नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. त्यापूर्वी आ. फरांदे यांनी समाजमाध्यमावर अशी पोस्ट केली की, प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. या विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही
त्यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पक्षप्रवेश करणारे नेते समर्थकांसह भाजपा कार्यालयाबाहेर समोरासमोर आले. महाजन पक्ष कार्यालयात जात असताना निष्ठावंतांनी त्यांना घेराव घातला होता. त्यामुळे या ठिकाणी हाय व्होल्टेज नाट्य झाले. दरम्यान मंत्री महाजन यांनी आ. फरांदे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घातली. त्यानंतर पक्ष प्रवेश झाले. परंतु या कार्यक्रमाला फरांदे अनुपस्थित होत्या. पक्षप्रवेशावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कामावर सर्वांचा विश्वास आहे. जे नेते आमच्यावर आणि आमच्या विचारसरणीवर टीका करत होते ते सर्व भाजपात येत आहे. पक्ष कसा वाढेल यावर आपल्याला काम करायचे आहे. पण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजपा प्रवेशाच्या घोषणेनंतर उबाठा खा. संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. विनायक पांडे म्हणाले की, मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाला तिकिटची मागणी केली होती. मुलाने मतदारसंघात कामही सुरू केले. पण यावर्षीही तिकीट कापले. आता आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवत आहोत. भाजपातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता आम्ही मनसे आणि उबाठाचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली. पण त्यांनी तिकीटाबाबत ठोस सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मधले नेते जाऊ देत नाहीत. माझी कोणावरही नाराजी नाही. आम्ही संपूर्ण पॅनल तयार केले आहे. पॅनल निवडून येणार. त्यांना उमेदवारही मिळणार नाही. ठाकरे यांच्यावर नाराजी नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून डावलले गेले. आताही तसेच सुरू होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे.
पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केले. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची खदखद पुन्हा व्यक्त केली. यावेळीही त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या की, निवडणूक निर्णय आज ज्यांचा प्रवेश झाला त्यांचे मी आज स्वागत करते. परंतु आज जे घडले ते मला आवडले नाही. महाजन यांच्यावर नाराजी नाही. काही दलाल आणि त्यांचा आपल्याच घरात तिकिटे मिळावी या स्वार्थातून राजकारण झाले. महाजन यांनी मला सांगितले आहे की, पक्ष प्रवेश झाला असला तरी अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची नियुक्ती केली होती. मात्र अवघ्या काही तासांतच जोरगेवार यांची पुन्हा निवडणूक प्रमुख म्हणून फेरनियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अजय संचेती यांच्याकडे निवडणूक निरीक्षक पद कायम ठेवण्यात आले आहे. जोरगेवार यांना हटवण्यात आल्याच्या बातम्या दिवसभर प्रसारित झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जोरगेवार यांच्या नियुक्तीचे नवे पत्र जारी करण्यात आले. महापालिका निवडणूक तोंडावर असताना घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली.
किशोर जोरगेवार म्हणाले की, मला पदावरून काढल्याची कोणतीही अधिकृत माहिती माझ्यापर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे फेरनियुक्ती असा प्रश्नच येत नाही. माझी नियुक्ती कायम होती. काही जणांकडून गैरसमज पसरवण्यात आला होता. मला आधीही नियुक्तीचा मेल आला होता आणि आता सर्वांचा गैरसमज दूर करण्यासाठी पुन्हा मेल पाठवण्यात आला आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
शौचालय वापरता का? दाखला द्या ! निवडणूक आयोगाची अजब अट
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना









