NCP Merger Plans: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुःखद घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भविष्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याच दरम्यान, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खळबळजनक खुलासा केला असून, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, असे सांगितले आहे.
१० फेब्रुवारीला होणार होती विलीनीकरणाची घोषणा?
अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे ही अजितदादांची मनापासून इच्छा होती.
या विलीनीकरणासाठी अजित पवारांनी जयंत पाटील आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत अनेकवेळा चर्चा केली होती. सुरुवातीला २० जानेवारी २०२६ पर्यंत या एकत्रीकरणाची घोषणा होणार होती. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
१० फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र येणार होते, असा निर्णयही झाला होता. मात्र, त्याआधीच ही भीषण दुर्घटना घडली.
आता या विलीनीकरणाबाबत शरद पवार, सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असेही देशमुख यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा?
दुसरीकडे, अजितदादांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यावर भाष्य करताना अनिल देशमुख म्हणाले की, “जर सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय झाला, तर ती आनंदाचीच गोष्ट आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर राजभवन येथे अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची दाट शक्यता आहे.
पवार कुटुंबाच्या निर्णयाकडे लक्ष
अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आता संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार का, हा मोठा प्रश्न आहे. विलीनीकरणाचा जो प्रस्ताव १० फेब्रुवारीसाठी तयार होता, तो आता अजितदादांच्या पश्चात प्रत्यक्षात येणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












