Anil Parab shambhuraj desai : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने झालेल्या वादाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटले असून, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. पुरेशा संख्याबळाचा अभाव असतानाही भाजपने प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून आपला अध्यक्ष बसवल्याचा गंभीर आरोप शिवसेना मंत्र्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारात पोलीस अधीक्षकांनी भाजपला मदत केल्याचा दावा करत मंत्री शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला.
अनिल परब यांचा कडाडून हल्लाबोल-
विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना चांगलेच धारेवर धरले. “साताऱ्यात साक्षात शंभूराज देसाई आणि दोन राजांना मार खावा लागला, तरीही तुम्ही भाजपचे नाव घेण्यास घाबरत आहात,” अशा शब्दांत त्यांनी टोलेबाजी केली. “भाजप तुम्हाला चिरडत आहे आणि तुम्ही केवळ मुकाट्याने मार खात आहात. तुमचे ते शौर्य आणि ‘वाघ’ आता कुठे गेले?” असा सवाल करत परब यांनी सत्ताधारी बाकांवरील नेत्यांना डिवचले. सत्तेला लाथ मारून बाहेर पडण्याचे धाडस दाखवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवसेना मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा आणि राजीनाम्याचा इशारा-
साताऱ्यातील या घटनेनंतर शिवसेना आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांनी आपली हतबलता आणि संताप व्यक्त केला. सत्ताधारी असूनही पोलीस आणि प्रशासनाकडून मिळणारी दुय्यम वागणूक आता सहन केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मंत्र्यांनी घेतली. इतकेच नव्हे तर, सन्मानाने काम करता येत नसेल तर आम्ही राजीनामा देऊ, असा इशाराही काही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर दिला. एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासकीय ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रशासकीय कारवाई आणि ‘एपस्टिन फाईल’वरून घेरले-
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र, अनिल परब यांनी यावरही शंका उपस्थित करत, “यापूर्वीही एका अधिकाऱ्याचे निलंबन होऊन तो पुन्हा पदावर परतला, मग या आदेशाचे काय होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. याच वेळी त्यांनी नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचा उल्लेख करत ‘महाराष्ट्राच्या एपस्टिन फाईल’बाबत सरकारचे धोरण काय आहे, अशी विचारणा करत प्रशासकीय आणि नैतिक अध:पतनावर बोट ठेवले.
शंभूराज देसाईंचे चोख प्रत्युत्तर-
अनिल परब यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची (शिंदे गट) बाजू भक्कमपणे मांडली. “आम्ही हतबल आहोत असा अर्थ कोणीही काढू नये,” असे त्यांनी बजावले. साताऱ्यात जे घडले ते निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य होते. आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि वेळ पडल्यास पुन्हा एकदा आमची ताकद दाखवू शकतो, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.










